शबरीमला मंदिराजवळ आंदोलन करणाऱ्या ७० भाविकांना रविवारी मध्यरात्री पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर परिस्थिती आणखी बिघडली आहे. शबरीमला मंदिर असेलेल्या पथनामथिट्टा जिल्ह्यात प्रतिबंधात्मक आदेश जारी करण्यात आले आहेत. दरम्यान, काही आंदोलकांनी पोलीस स्टेशनबाहेर तसेच थिरुअनंतपुरम येथील क्लिफ हाऊस या मुख्यमंत्री पिनरायी विजयन यांच्या निवासस्थानाबाहेर ठिय्या मांडला.


राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या संलग्न संघटना या निषेध आंदोलनाचा आढावा घेत आहेत. त्यानंतर भारतीय जनता पार्टीचे नेते राज्यपाल पी. सथासिवम यांची भेट घेऊन त्यांच्याकडे भाविकांना शांततेत दर्शन घेता यावे अशी विनंती करण्यात येणार आहे. दरम्यान, पोलिसांच्या कारवाईविरोधात भाजपाची युवा विंग भारतीय जनता युवा मोर्चा सोमवारी राज्यभर आंदोलने करणार आहे. भाजयुमोचा अध्यक्ष प्रकाश बाबू याने ही माहिती दिली.

दरम्यान, इथली परिस्थिती ही आपत्कालीन परिस्थीतीपेक्षा वाईट बनली आहे. भाविकांना येथे दर्शनासाठी जाऊ दिले जात नाही. काहीही कारण नसताना सरकारने इथं जमावबंदीचे १४४ कलम लागू करण्यात आले आहे. भाविक हे दहशतवादी नाहीत. मग इथं १५००० पोलीस कर्मचारी कशासाठी तैनात करण्यात आले आहेत, असे पर्यटन राज्यमंत्री के. जे. अल्फान्स यांनी म्हटले आहे.

भगवान अयप्पाच्या भाविकांनी रविवारी रात्री शबरीमला मंदिराबाहेरच मंत्रोपचार सुरु केले. त्यामुळे पोलिसांना त्यांच्यावर कारवाई करीत त्यांना ताब्यात घेतले आणि त्यांना बेस कॅम्पवर आणण्यात आले. पोलिस ज्यावेळी ४ आयोजकांना ताब्यात घेण्यासाठी आले तेव्हा भाविकांचे म्हणणे होते की, स्वामी सरनाम घेताना पोलीस आम्हाला अटक करु शकत नाहीत.