वैमानिक बचावला

भारतीय हवाई दलाचे मिग २७ विमान सोमवारी येथील रहिवासी भागात कोसळले त्यात वैमानिक सुरक्षित बचावला. प्रशिक्षण फेरीसाठी हे विमान सकाळी साडेअकरा वाजता आकाशात झेपावले होते. मिग २७ विमानाने जोधपूर हवाई दल स्टेशनवरून भरारी घेतली व त्यानंतर त्यात काहीतरी तांत्रिक बिघाड झाला. त्यानंतर ते कुरी भगतासनी हाउसिंग बोर्डाच्या एका कुलुपबंद घरावर जाऊन धडकले असे जिल्हा दंडाधिकारी विष्णू चरण मलिक यांनी सांगितले. विमानाने कोसळल्यानंतर पेट घेतला नंतर अग्निशमन बंब आग विझवण्यासाठी पाठवण्यात आले. वैमानिकाने विमान कोसळण्याच्या काही सेकंद आधी सुटका करून घेण्यात यश मिळवले. भारतीय हवाई दलाच्या सूत्रांनी सांगितले की, या विमानात तांत्रिक बिघाड झाला होता व ते उतरवण्याची तातडीने गरज होती, पण नंतर इंजिनच बंद पडले त्यामुळे वैमानिकाने सुटका करून घेतली. संरक्षण प्रवक्ते लेफ्टनंट कर्नल मनीष ओझा यांनी सांगितले की, मिग २७ विमान सकाळी ११.३० वाजता कोसळले. हे विमान नेहमीच्या प्रशिक्षण फेरीवर होते व वैमानिक सुखरूप वाचला. या प्रकरणी चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत. जोधपूर पश्चिमचे पोलीस सह आयुक्त सीमा हिंगोनिया यांनी सांगितले की, ज्या घरावर विमान कोसळले त्या घराच्या काही भागाचे मोठे नुकसान झाले आहे.