जोधपूर हवाई तळावरून शुक्रवारी आकाशात अखेरची भरारी घेत ‘मिग २७’ हे  लढाऊ विमान निवृत्त झाले. देशाला स्वातंत्र्य मिळाल्यापासून लढाऊ विमानांची कमतरता, हा भारतीय हवाई दलासाठी कळीचा मुद्दा राहिला आहे. ही कमतरता दूर करण्यासाठी मधल्या काळात सुखोई विमाने मोठय़ा संख्येने दलात समाविष्ट झाली. आगामी काळात राफेलसह अन्य काही आधुनिक श्रेणीतील विमानेही दाखल होतील. या वाटचालीत भेदक  माऱ्यात तीन दशके आघाडीवर राहिलेल्या ‘मिग २७’ ची नेत्रदीपक कामगिरी अविस्मरणीय आहे.

१९८५ मध्ये वायुदलात समाविष्ट

भारतीय हवाई दलात रशियन बनावटीच्या मिग बनावटीच्या विमानांची संख्या अधिक आहे. त्यातील प्रगत विमान म्हणून मिग २७ कडे पाहिले गेले. तत्कालीन सोव्हिएत युनियनकडून प्रारंभी काही मिग २७ विमानांची खरेदी करण्यात आली. १९८५ मध्ये ती ताफ्यात समाविष्ट झाली. नंतर हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेडच्या नाशिक प्रकल्पात या विमानांची बांधणी करण्यात आली. जवळपास १६५ मिग २७ विमानांनी हवाई दलाची शक्ती वृध्दिंगत केली. विशिष्ठ काही तास उड्डाण झाल्यानंतर (साधारणत: १० वर्ष) विमानांच्या सुरक्षिततेसाठी संपूर्ण दुरुस्ती बंधनकारक असते. मिग २७ च्या सखोल दुरुस्तीचे काम नाशिकच्या एचएएल केंद्रात झाले. कालांतराने काही विमानांचे याच ठिकाणी नूतनीकरणदेखील झाले.

अफाट क्षमता

एक इंजिन असणारे हे लढाऊ विमान एक आसनी आहे. ताशी १७०० किलोमीटर वेगाने मार्गक्रमण. चार हजार किलोग्रॅम शस्त्रास्त्रे वाहून नेण्याची क्षमता. जमिनीवर अचूक लक्ष्यभेदाचे सामर्थ्य हे त्याचे वैशिष्ठय़. खुद्द हवाई दलाने आकाशातून जमिनीवर अचूक अन् भेदक हल्ले चढविण्यास सक्षम असणारे पराक्रमी विमान असा त्याचा गौरव केला आहे. जमिनीवर लक्ष्याचा शोध घेण्याकरिता खास प्रणाली त्यात समाविष्ट आहे.

३० वर्षांची वाटचाल

जवळपास ३० वर्षांपासून हवाई दलाच्या सेवेत मिग २७ ने महत्वाची भूमिका निभावली. सर्वसाधारणपणे कोणत्याही विमानाचे सहा हजार उड्डाण तास इतके आयुष्य मानले जाते. ते वाढविण्यासाठी नूतनीकरण करावे लागते. यामध्ये तंत्रज्ञानदृष्टय़ा त्यास सक्षमही केले जाते. मिग २७ ची नूतनीकरणाची ही प्रक्रिया काही वर्षांंनी पार पडली. सध्याच्या आधुनिक लढाऊ विमानांच्या तुलनेत तंत्रज्ञानदृष्टय़ा मिग २७ मागे पडले.

टोपण नावांसह कामगिरीतही वेगळेपण

कारगील युध्दात मिग २७ ने डोंगर रांगांमध्ये तळ ठोकून बसलेल्या पाकिस्तानी घुसखोरांवर रॉकेट आणि बॉम्बचा अचूक वर्षांव करत आपली क्षमता सिद्ध केली होती. या कामगिरीने ‘बहाद्दूर’ या टोपण नांवाने विमानाचा गौरव झाला. मेघदूत मोहिमेवेळी मिग २७ ने सियाचीन भागात गस्त घालण्याची जबाबदारी सांभाळली. त्या काळात ११ हजार फूट उंचीवरील लेह हवाई तळावर हे विमान प्रथमच उतरले होते. चाचणी प्रशिक्षकांनी मिग २७ ला ‘बाल्कन’ असेही टोपणनांव दिले. मिग श्रेणीतील आधीच्या विमानांच्या तुलनेत मिग २७ ची कॉकपिट पूर्णत: वेगळी आहे. त्यातून समोरील चित्र अधिक व्यापकपणे दिसते. लांब नाक असणाऱ्या विमानास रशियन वैमानिक ‘उ्टकोनस’ म्हणायचे.

अपघातांच्या मालिकांमुळे चर्चेत

मिग श्रेणीतील विमाने वाढत्या अपघातांमुळे कायम चर्चेत राहिली. मिग २१, मिग २३ पाठोपाठ मिग २७ ला देखील नियमित सरावावेळी काही अपघातांना सामोरे जावे लागले.  चार दशकात हवाई दलातील मिग श्रेणीतील एकूण ८७२ पैकी निम्मी ४८२ विमाने अपघातग्रस्त झाले. यामध्ये १७१ वैमानिकांना प्राण गमवावे लागले. या व्यतिरिक्त ३९ नागरिक आणि इतर आठ शासकीय कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाल्याची माहिती काही वर्षांपूर्वी संसदेत दिली गेली होती. अपघातांच्या मालिकेत मिग २१ चा अधिक्याने समावेश होता. २००१-१० या कालावधीत १२ मिग २७ अपघातग्रस्त झाले होते. यामुळे एकवेळ अशी आली की, या विमानांचा संपूर्ण ताफा जमिनीवर ठेवण्याचा निर्णय घ्यावा लागला होता. या एकंदर स्थितीत मिग २७ च्या तुकडीला टप्प्याटप्प्याने निवृत्त करण्याची प्रक्रिया पूर्णत्वास गेली आहे.