करोनाच्या दुसरी लाट भारतासाठी विनाशकारी ठरत आहे. दुसर्‍या लाटेमुळे दररोज हजारो लोक मरत आहेत. त्यामुळे आरोग्य व्यवस्थेचे तिनतेरा वाजल्याचे चित्र आहे. ही लाट रोखण्यासाठी देशात काही निर्बंधासह लॉकडाउन लागू आहे. या लाटेत भारतात विक्रमी रुग्णसंख्येची नोंद झाली. नवीन रुग्णसंख्येत घट होताना दिसत आहे. तर दुसरीकडे करोना मृत्यूची संख्या वाढत असल्याचं दृश्य आहे. दरम्यान, दुसर्‍या लाटेसाठी स्थलांतरित कामगार जबाबदार आहेत. तसेच धार्मिक कार्यक्रमांमुळेही त्याचा विस्तार झाला, असा दावा भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेने आपल्या एका संशोधनात केला आहे.

प्रारंभीच्या काळात करोना संक्रमणाचा प्रसार होण्याची मुख्य कारणे प्रवासी कामगार आणि धार्मिक कार्यक्रम असू शकतात, असा दावा आयसीएमआरच्या अहवालात करण्यात आला आहे. जानेवारी २०२० ते ऑगस्ट २०२० मधील सार्स सीओव्ही २ च्या क्रमाच्या विश्लेषणामुळे स्पाइक प्रोटीनमध्ये E४८४Q म्यूटेशन दिसून आले, असे अहवालात म्हटले आहे.

आयसीएमआरने म्हटले आहे की, देशात करोना विषाणू बी १.१.७, व्हिएरिएंट ऑफ कॉन्सर्ट आणि बी १.३५१ चे तीन प्रकार आढळले आहेत. या प्रकारांबद्दलची परिस्थिती चिंताजनक होती. कारण ते रोगाचा प्रतिकार करण्याची क्षमता कमी करतात.

उत्तर भारतातील अनेक राज्यांतील लाखो कामगार देशाच्या महानगरांमध्ये नोकरी करतात. या कामगारांना करोना संकटामुळे लॉकडाऊनमध्ये रोजगाराच्या संकटाचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे ते लाखोंच्या संख्येने आपल्या राज्यात परत जातात. मजुरांबरोबरचं करोनाचा संसर्गही या राज्यात पोहोचण्याची शक्यता असते.

देशात करोनाच्या दुसऱ्या लाटेत रुग्णसंख्या मोठ्या प्रमाणात वाढत गेली.  देशात गेल्या महिनाभरापासून दररोज चार हजारांच्या आसपास करोना रुग्णांचे मृत्यू होत आहेत. मात्र बुधवारी ही संख्या काही प्रमाणात कमी झाल्याचे दिसत आहे. गेल्या २४ तासांत देशभरात ३ हजार ८७४ रुग्णांचा करोनामुळे मृत्यू झाला आहे.

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने प्रसिद्ध केलेल्या आकडेवारीनुसार देशात मागील २४ तासांत म्हणजे बुधवारी दिवसभरात दोन लाख ७६ हजार ७० नवीन करोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत. तर दिलासा देणारी बाब म्हणजे याच कालावधीत देशात तीन लाख ६९ हजार ७७ रुग्ण करोनावर मात करून घरी परतले आहेत. गेल्या २४ तासांत ३,८७४ मृत्यूंची नोंद झाली आहे. देशात एकूण मृतांची संख्या दोन लाख ८७ हजार १२२ वर जाऊन पोहोचली आहे. यात सर्वाधिक मृत्यू महाराष्ट्रात नोंदवले गेले आहेत. महाराष्ट्रात ५९४ मृत्यू झाले आहेत. महाराष्ट्रात ३४ हजार ३१ नवीन रुग्ण आढळून आले आहेत.