उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी अनधिकृतपणे चालत किंवा वाहनाच्या सहाय्याने राज्यात येणाऱ्या मजुरांना रोखण्याचा आदेश दिल्यानंतर सीमारेषेवर स्थलांतरित मजुरांचा उद्रेक पहायला मिळाला. उत्तर प्रदेश-मध्य प्रदेश सीमारेषेवरील रेवा जिल्ह्यातील चाकघाट परिसरात हजारोंच्या संख्येने मजूर उपस्थित होते. यावेळी संतप्त मजुरांनी पोलिसांचे बॅरिकेट्स तोडत राज्यात प्रवेश केला. मजूर इतक्या संख्येत असल्याने पोलीसदेखील त्यांच्यासमोर हतबल झाल्याचं पहायला मिळालं.

उत्तर प्रदेशात अनेक स्थलांतरित मजुरांचा रस्ते अपघातात मृत्यू झाल्याच्या घटनांनंतर मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी अधिकाऱ्यांना कडक कारवाईचे आदेश दिले आहेत. योगी आदित्यनाथ यांनी आदेश देताना जिल्हाधिकाऱ्यांना कोणत्याही परवानगीविना राज्यात प्रवेश कऱणारी वाहने जप्त करण्याचे आदेश दिले आहेत. यासोबत अशा वाहन मालक आणि चालकांविरोधात गुन्हा दाखल करण्याचाही आदेश देण्यात आला आहे. यावेळी योगी आदित्यनाथ यांनी मजुरांना आपल्या घरी पाठवण्यासाठी एक योग्य व्यवस्था करण्याची गरज असून त्यांच्या अन्न आणि पाण्याची काळजी घेतली पाहिजे असंही सांगितलं आहे.

मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी सांगितलं आहे की, “पोलिसांनी पायी चालत येणाऱ्यांमध्ये जनजागृती केली पाहिजे”. नियमांचं कडक पालन केलं पाहिजे असं योगी आदित्यनाथ यांनी सांगितलं आहे. योगी आदित्यनाथ यांच्या अध्यक्षतेखाली एक उच्चस्तरीय बैठक पार पडली. यावेळी त्यांनी मजूर, कामगारांना आपला आणि कुटुंबाचा जीव धोक्यात घालून पायी अथवा बेकायदेशीर वाहनाने प्रवास करु नका असं आवाहन केलं. आपलं सरकार प्रत्येकाला सुरक्षित आणि सन्मानपूर्वक आपल्या घरी पोहोचवण्यासाठी युद्धस्तरावर काम करत असल्याचं यावेळी त्यांनी सांगितलं.

राज्य सरकार प्रवासी मजूर, कामगारांना ट्रेन प्रवासासाठी तिकीटाचे कोणतेही पैसे आकारत नसल्याचं योगी आदित्यनाथ यांनी सांगितलं आहे. याआधीही योगी आदित्यनाथ यांनी प्रवासी मजुरांना पायी किंवा खासगी वाहनाने येऊ नका असं आवाहन केलं आहे. सीमेवर पोहोचणाऱ्या मजूर, कामगारांच्या अन्न, पाण्याची व्यवस्था केली जावी आणि तपासणी केल्यानंतर त्यांना त्यांच्या घरी पोहोचवण्याची सुविधा केली जावी असा आदेश आधीच त्यांनी दिला आहे.