दिल्लीहून बिहारला आलेल्या श्रमिक मजुराच्या साडेचार वर्षाच्या मुलाचा उपासमारीमुळे मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना बिहारमध्ये घडली आहे. दिल्लीहून श्रमिक विशेष ट्रेनने बिहारमधील मुज्जफरपूर रेल्वे स्थानकात घडला आहे. मुलाला भूक लागली असल्याने वडील रेल्वे स्थानकामध्ये दूध मिळतय का शोधत असतानाच या मुलाचा दुर्देवी मृत्यू झाला. यासंदर्भातील वृत्त पीटीआय या वृत्तसंस्थेने दिलं आहे.

दिल्लीमधील झोपडपट्टीमध्ये राहणारा मसूद आलम हा मूळचा पश्चिम चंपारण जिह्ल्यातला. मागील अनेक वर्षांपासून तो दिल्लीमध्ये रंगकाम करण्याचं काम करत होता. पत्नी झेबा आणि मुलगा इश्क असे मसूदचे त्रिकोणी कुटुंब होतं. मात्र लॉकडाउन सुरु झाल्यानंतर सर्व काम ठप्प झाल्याने मसूदच्या कुटुंबावर आर्थिक संकट आलं. एका मागून एक दिवस लॉकडाउन वाढत असल्याने साठवून ठेवलेले पैसेही संपल्याने मसूदने कुटुंबासहीत आपल्या मूळ गावी परतण्याचा निर्णय घेतला. झोपडपट्टीमधील भाड्याच्या घरात राहणाऱ्या मसूदने डिपॉझीटही न घेता दिल्ली सोडण्याचा निर्णय घेतला. श्रमिक विशेष ट्रेनने हे तिघेही रविवारी बिहारला येण्यासाठी निघाले. ईद आपल्या कुटुंबाबरोबर साजरी करण्यासाठी मसूद आणि झेबा उत्सुक होते. मात्र ट्रेनमध्येच त्यांच्या मुलाला त्रास सुरु झाला. प्रचंड उष्णतेमुळे त्याला अस्वस्थ वाटू लागलं. आम्ही मुज्जफरपूर स्थानकात पोहचेपर्यंत त्यांची प्रकृती अत्यंत चिंताजनक झाली. त्यामुळे मी स्थानकामधील अधिकाऱ्यांना शोधून दूध मिळण्यासंदर्भात मागणी केली. त्यांनी माझ्या विनंतीला प्रतिसाद देईपर्यंत मुलाने प्राण सोडले होते, असं मसूदने सांगितलं.

वाचा >> उपासमारीमुळे महिलेचा रेल्वे स्थानकावरच मृत्यू, बाळाची मात्र आईला उठवण्यासाठी केविलवाणी धडपड

ईदच्या निमित्त आम्ही घरी जाऊन एकत्र आनंद साजरा करण्याचा विचार करत होतो. पण देवाने आमच्या नशिबात वेळच काहीतरी वाढून ठेवलं होतं याचा आम्हाला अंदाज नव्हता, अशा शब्दांमध्ये मसूदने आपले दु:ख व्यक्त केलं. तर झेबाला मुलाच्या मृत्यूमुळे मोठा झटका बसला असून ती काहीही बोलण्याच्या मानसिकतेमध्ये नाहीय. रेल्वेचे पोलीस उपअधीक्षक रमाकांत उपाध्याय यांनी ट्रेनमध्येच मुलाची तब्बेत बिघडली आणि ट्रेन मुजफ्फरपूर स्थानकात येण्यापूर्वीच त्याचा मृत्यू झाला होता, असा दावा केला आहे.

दुर्देवाने हा प्रकार घडला त्याच दिवशी याच रेल्वे स्थानकामध्ये एका २३ वर्षीय महिलेचाही मृत्यू झाला. ही २३ वर्षीय महिलेने शनिवारी (२३ मे रोजी) गुजरातमधील अहमदाबाद रेल्वे स्थानकातून श्रमिक विशेष ट्रेन पकडली होती. मात्र प्रवासादरम्यान पुरेश्या प्रमाणात पाणी आणि अन्न न मिळाल्याने या महिलेला बरं वाटतं नव्हतं. अखेर रेल्वे मुज्जफरपूर रेल्वे स्थानकात पोहचल्यानंतर खाली उतरल्यावर या महिलेला चक्क आली आणि ती खाली पडली. काही जणांनी या महिलेला प्लॅटफॉर्मवरील एका ब्रिजखाली ठेवले तिथेच तिचा मृत्यू झाला.