26 April 2019

News Flash

लैंगिक गैरवर्तणुकीबद्दल मिका सिंगला दुबईमध्ये अटक

एका १७ वर्षीय ब्राझिलिअन मॉडेलचा लैंगिक छळ केल्याचा आरोप त्याच्यावर आहे. या मॉडेलनेच संयुक्त अरब अमिरातीच्या पोलिसांत तक्रार दिल्याने मिकावर अटकेची कारवाई करण्यात आली.

मिका सिंग, mika singh

प्रसिद्ध गायक मिका सिंग याला लैंगिक गैरवर्तणुकीच्या आरोपाखाली दुबईमध्ये अटक झाल्याचे वृत्त आहे. एका १७ वर्षीय ब्राझिलिअन मॉडेलचा लैंगिक छळ केल्याचा आरोप त्याच्यावर आहे. या मॉडेलनेच संयुक्त अरब अमिरातीच्या पोलिसांत तक्रार दिल्याने मिकावर अटकेची कारवाई करण्यात आली.

मिकाने पीडित अल्पवयीन मॉडेलला मोबाईलवरुन आक्षेपार्ह फोटोज पाठवल्याचा आरोप त्याच्यावर आहे. माध्यमांमध्ये प्रसिद्ध झालेल्या वृत्तानुसार, दुबईमधील मुराक्कबात पोलीस ठाण्यामध्ये मिकाविरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे. त्याला बुधवारी मध्यरात्री ३ वाजता बुर दुबई येथून ताब्यात घेण्यात आले. बॉलिवूडच्या ‘मसाला अॅवॉर्ड’ या पुरस्कार सोहळ्यात परफॉर्मन्ससाठी मिका दुबईला गेला होता.

दरम्यान, हा पुरस्कार सोहळा सुरु होण्यापूर्वी मिकाने आपल्या इन्स्टाग्रामवर एक फोटो पोस्ट करीत या प्रसिद्ध पुरस्कार सोहळ्यासाठी मी दुबई शहरात पहिल्यांदाच दाखल झाल्याचे म्हटले आहे.

मिकावर २०१६मध्ये एका ३२ वर्षीय मॉडेलने अशाच प्रकारे विनयभंगाची तक्रार मुंबईतील वर्सोवा पोलिसांत दाखल केली होती. त्यानंतर त्याच्यावर तीन विविध कलमांखाली गुन्हा दाखल झाला होता. यावेळी मिकाने आपल्यावरील सर्व आरोप फेटाळले होते. तसेच त्याने तक्रारदार मॉडेलविरोधात तक्रार दाखल केली होती. या मॉडेलने आपल्याकडून पैसे उकळण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप त्याने या तक्रारीत केला होता. या मॉडेलने आपल्याकडे ५ कोटी रुपयांची मागणी केली होती. जर ही रक्कम दिली नाही तर तुझे करीअर उद्धवस्त करु टाकीन अशी धमकी तिने दिल्याचे मिकाने तक्रारीत म्हटले होते.

First Published on December 6, 2018 9:55 pm

Web Title: mika singh gets arrested in dubai for alleged sexual misconduct