दिल्लीतील निकालानंतर नेत्यांच्या एकमेकांवर आरोपांच्या फैरी

नवी दिल्ली:  दिल्ली विधानसभा निवडणुकीत एकही जागा जिंकू न शकलेल्या काँग्रेस पक्षात आता नेते एकमेकांवर आरोपांच्या फैरी झाडू लागले आहेत. त्यांच्या वादात न पडता पक्षनेतृत्वाने दिल्लीतील पराभवावर कोणतीही प्रतिक्रिया व्यक्त केलेली नाही.

दिल्ली प्रदेश काँग्रेसचे प्रभारी पी. सी. चाको यांनी राजधानीतील पक्षाच्या दुरवस्थेला थेट शीला दीक्षित यांना जबाबदार धरले. दिवंगत काँग्रेस नेत्या शीला दीक्षित या सलग तीन वेळा दिल्लीच्या मुख्यमंत्री होत्या. दीक्षित यांच्या काळात २०१३ पासूनच दिल्लीत काँग्रेसच्या घसरणीला सुरुवात झाली होती, असा आरोप चाको यांनी केला. मात्र, चाको यांच्या विधानावर मिलिंद देवरा यांनी प्रत्युत्तर दिले.

दीक्षित या निष्णात राजकारणी होत्या. काँग्रेसच्या पडझडीला दीक्षित यांना कोणी जबाबदार धरू नये, असे ट्वीट देवरा यांनी केले. तर, पवन खेरा यांनीही चाकोंवर टीका केली. २०१५ मध्ये प्रदेश काँग्रेसची जबाबदारी दीक्षित यांच्याकडे नव्हती. तेव्हा काँग्रेसला १० टक्के मते मिळाली. २०१९ मध्ये लोकसभा निवडणुकीत पुन्हा दीक्षित यांच्याकडे दिल्ली काँग्रेसची जबाबदारी दिली गेली तेव्हा काँग्रेसला २३ टक्के मते मिळाली होती, असा युक्तिवाद खेरा यांनी केला.

माजी अर्थमंत्री पी. चिदम्बरम यांनी भाजपचा पराभव केल्याबद्दल ‘आप’चे कौतुक केले. त्यांनी दिल्लीकर मतदारांना अभिवादन करणारे ट्वीट केले. दिल्लीत देशाच्या कानाकोपऱ्यातून लोक आलेले आहेत. त्यांनी भाजपच्या ध्रुवीकरणाचा डाव हाणून पाडला. दिल्लीतील निकाल विरोधी पक्षांसाठी सकारात्मक बाब असून २०२१ व २०२२ मध्ये ज्या राज्यांमध्ये विधानसभेच्या निवडणुका होणार आहेत, तिथे भाजपचा पराभव करता येणे शक्य आहे, असे चिदम्बरम म्हणाले.

चिदम्बरम यांनी आपला दिलेल्या शाबासकीवर पक्ष प्रवक्त्या शर्मिष्ठा मुखर्जी यांनी नाराजी व्यक्त केली. चिदम्बरम यांच्यावर टीका करताना मुखर्जी म्हणाल्या की, ‘आप’च्या विजयाबद्दल इतके आनंदी होण्याचे काय कारण आहे? भाजपला पराभूत करण्याचे कंत्राट काँग्रेसने प्रादेशिक पक्षांना दिलेले आहे का? काँग्रेसच्या दारुण पराभवापेक्षा आपचा विजय अधिक महत्त्वाचा वाटतो का? असे असेल तर प्रदेश काँग्रेसला कुलूप लावून टाकलेले अधिक बरे, अशा शब्दांत मुखर्जी यांनी संताप व्यक्त केला.

दिल्ली विधानसभेत सलग दुसऱ्यांदा काँग्रेसचा एकही उमेदवार जिंकू शकला नाही. काँग्रेसला  ४ टक्के मते मिळाली. गेल्या वेळेपेक्षा टक्केवारी सहाने घसरली. उत्तर प्रदेशच्या दौऱ्यावर असलेल्या काँग्रेसच्या महासचिव प्रियंका गांधी-वढेरा यांनी काँग्रेससाठी हा संघर्षांचा काळ असून पक्षाला कसून काम करण्याची गरज असल्याचे मत व्यक्त केले.

केजरीवाल यांचा रविवारी शपथविधी

दिल्ली विधानसभा निवडणुकीत पक्षाला  विजय मिळवून देणारे आम आदमी पक्षाचे प्रमुख अरविंद केजरीवाल हे येत्या रविवारी रामलीला मैदानावर होणाऱ्या एका समारंभात तिसऱ्यांदा मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार आहेत. २०११ साली ज्या ऐतिहासिक मैदानावर केजरीवाल यांनी समाजसेवक अण्णा हजारे यांच्यासह व्यापक भ्रष्टाचारविरोधी आंदोलनाचे नेतृत्व केले होते, त्याच मैदानावर  सकाळी १० वाजता हा शपथविधी होणार आहे.