उत्तर काश्मीरमधील हंडवारा परिसरात बुधवारी लष्कराच्या ताफ्यावर दहशतवाद्यांनी हल्ला केला. या हल्ल्यात भारतीय लष्कराचे तीन जवान जखमी झाले आहेत. दरम्यान, सध्या लष्कराकडून हा संपूर्ण परिसर खाली करण्यात आला असून हल्लेखोर दहशतवाद्यांचा कसून शोध घेतला जात आहे. जखमी जवानांपैकी एका जवानाची प्रकृती गंभीर असून या जवानाला उपचारासाठी खास विमानाने श्रीनगर येथील लष्करी रूग्णालयात हलविण्यात आले आहे. भारतीय जवानांचा ताफा कुपवाड्याच्या दिशेने जात असताना हा प्रकार घडला. श्रीनगरपासून सुमारे ६६ किलोमीटर अंतरावर असलेल्या लंगेट येथून जात असताना कालगुंड गावाजवळ दबा धरून बसलेल्या दहशतवाद्यांनी अचानक हल्ला केला. बेछूट गोळीबार करून दहशतवादी पसार झाले. भारतीय लष्कराच्या ताफ्यावर गेल्या महिन्याभरात दुसऱ्यांदा अशाप्रकारचा हल्ला झाला आहे. या हल्ल्यानंतर भारतीय लष्कराच्या तुकड्या दिवसाउजेडी एका ठिकाणहून दुसऱ्याठिकाणी ये-जा करत असत. मात्र, बुरहान वानीच्या खात्म्यानंतर काश्मीरमध्ये उसळलेल्या हिंसाचारानंतर लष्करी ताफ्यांची वाहतूक पुन्हा रात्रीच्या वेळेस सुरू झाली होती.

पाकिस्तानी सैन्याने मंगळवारी पहाटे पुंछ जिल्ह्यात नियंत्रण रेषेवरील भारतीय चौक्यावर गोळीबार करत शस्त्रसंधीचे उल्लंघन केले होते. आता दहशतवाद्यांनी लष्कराच्या ताफ्याला लक्ष्य केले आहे. याआधी १९ ऑगस्टला बीएसएफच्या तळावर करण्यात दहशतवादी हल्ला झाला होता. तर, २५ जून रोजी सीआरपीएफच्या बसवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यात ८ जवान शहीद झाले होते.