काश्मीरच्या अनंतनाग जिल्ह्यात सोमवारी फुटीरतावादी दहशतवाद्यांनी पोलिसांची शस्त्रे हिसकावून पलायन केल्याचा प्रकार घडला. येथील दालवश गावातील दूरदर्शनच्या टीव्ही टॉवरजवळ हे सुरक्षारक्षक पहारा देत होते. यावेळी कमी क्षमतेच्या ट्रान्समीटर स्टेशनजवळ असणाऱ्या सुरक्षा चौकीतील पोलिसांना बंदुकीचा धाक दाखवून दहशतवाद्यांनी त्यांच्या रायफल्स पळवून नेल्या. या घटनेनंतर संपूर्ण परिसरात शोधमोहीम हाती घेण्यात आली आहे. येथील चार पोलीस स्थानकांच्या परिसरात कलम १४४ लागू करण्यात आले आहे. यापूर्वीही पुलवामा जिल्ह्यात अशाचप्रकारे सुरक्षा चौकीवर हल्ला करून दहशतवाद्यांनी दोन बंदुका पळवून नेल्या होत्या.

तत्पूर्वी एका आठवडय़ाच्या शांततेनंतर पाकिस्तानी फौजांनी शस्त्रसंधीचे उल्लंघन करून नियंत्रण रेषेलगतच्या राजौरी जिल्ह्य़ातील चौक्यांवर लहान शस्त्रांनी गोळीबार केला. भारतीय फौजांनीही त्याला गोळीबाराने चोख उत्तर दिले.
राजौरी जिल्ह्य़ातील नौशेरा भागात नियंत्रण रेषेवर पाकिस्तानी फौजांनी सीमेपलीकडून विनाकारण गोळीबार केला. नियंत्रण रेषेचे रक्षण करणाऱ्या भारतीय फौजांनी त्याला प्रत्युत्तर दिले. या गोळीबारात कुणीही जखमी झाले नाही, असे जम्मू येथील संरक्षण मंत्रालयाच्या प्रवक्त्याने सांगितले.
भारतीय लष्कराने पाकव्याप्त काश्मिरात घुसून दहशतवादी तळ उद्ध्वस्त केल्यानंतर जम्मू- काश्मिरात नियंत्रण रेषेवर शस्त्रसंधी उल्लंघनाच्या २५हून अधिक घटना घडल्या आहेत, असे लष्कराच्या एका वरिष्ठ  अधिकाऱ्याने सांगितले.
पूंछ जिल्ह्य़ात गोळीबार आणि तोफगोळ्यांच्या माऱ्यात पाच नागरिक आणि लष्कराचे ४ जवान जखमी झाले आहेत. नियंत्रण रेषेनजीक भारतीय फौजांनी गोळीबाराने दिलेल्या प्रत्युत्तरात पाकिस्तानचे ५ सैनिक जखमी झाले आहेत. ५ ऑक्टोबरला पाकिस्तानी फौजांनी शस्त्रसंधीचे तीनवेळा उल्लंघन करताना पूंछ व राजौरी जिल्ह्य़ातील तीन क्षेत्रांमध्ये १० आघाडय़ांवर अनेक भारतीय चौक्या व नागरी वसाहतींना लक्ष्य करून तोफांचा भडिमार केला होता.
त्यापूर्वी ३ ऑक्टोबरला पाकिस्तानी फौजांनी शस्त्रसंधीचा चारवेळा भंग करून पूंछ जिल्ह्य़ातील सौजियान, शाहपूर- केरनी, मंडी व केजी सेक्टरमध्ये जोरदार गोळीबार व तोफगोळ्यांचा मारा केला होता.