बंडखोरांचे आंदोलन चिरडून टाकण्यासाठी रासायनिक अस्त्रांचा वापर करणाऱ्या सीरियावर अमेरिकेकडून होणारी लष्करी कारवाई लांबणीवर पडली आहे. मित्रराष्ट्रांचा विरोध आणि संयुक्त राष्ट्रांच्या अहवालाची प्रतीक्षा ही यामागील मुख्य कारणे असल्याचे सांगितले जात आहे. दरम्यान, अमेरिका किंवा कोणीही आमच्यावर हल्ला केला तर अंतिमत: आमचाच विजय होईल, अशी गर्जना अध्यक्ष बाशर यांनी केली आहे.
गेली चार दशके सीरियाच्या अध्यक्षस्थानी ठाण मांडून बसलेले बाशर-अल्-असद यांच्याविरोधात देशभर असंतोषाचे वातावरण आहे. बंडखोरांनी सीरियाचा ६० टक्केभाग काबीज केला असून राजधानी दमास्कस येथेही बंडखोरांचे प्राबल्य आहे. या बंडखोरांना चिरडून टाकण्यासाठी गेल्या आठवडय़ात दमास्कसमध्ये रासायनिक अस्त्रांद्वारे केलेल्या हल्ल्यात तब्बल तेराशे नागरिक मारले गेले होते. यामध्ये लहान मुलांचाही समावेश होता. या हल्ल्यानंतर जगभरात खळबळ उडाली व अमेरिका व मित्रराष्ट्रांनी या घटनेची गंभीर दखल घेतली.
हा हल्ला बाशर यांनीच घडवून आणल्याचा अमेरिकेचा कयास असून याची पुनरावृत्ती होऊ नये, या हेतूने सीरियावर मर्यादित स्वरूपाची लष्करी कारवाई करण्याचा निर्णय अमेरिकेने दोन दिवसांपूर्वी घेतला होता. या हल्ल्यात सीरियाच्या शस्त्रागाराला लक्ष्य करण्यात येणार असल्याचेही घोषित करण्यात आले होते. मात्र, दमास्कसमध्ये झालेल्या या हल्ल्यात रासायनिक अस्त्रांचा वापर झाला होता का, याची चौकशी करण्यासाठी संयुक्त राष्ट्रांचे एक पथक सध्या दमास्कसमध्ये दाखल झाले आहे. या पथकाचा अहवाल येईपर्यंत सीरियावर हल्ला करणे योग्य होणार नाही, असा सूर इंग्लंडने तसेच अमेरिकेतील काही घटकांनी लावल्याने ही कारवाई लांबणीवर पडली आहे.
दरम्यान, सीरियाचे पंतप्रधान वाएल-अल-हल्की यांनी अध्यक्ष बाशर यांच्या सुरात सूर मिसळले आहेत. आमच्यावर कोणी हल्ला केल्यास ते चकित होतील, असे प्रत्युत्तर आम्ही देऊ, असे ते म्हणाले.
ओबामा यांचे संकेत
सीरियावरील हल्ल्याच्या या निर्णयावर अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामा अद्याप ठाम आहेत. याबाबतीत आम्ही अद्याप अंतिम निर्णय घेतलेला नाही, मात्र जगात कोठेही रासायनिक अस्त्रांचा वापर केला जाऊ नये, हा आंतरराष्ट्रीय संकेत आहे, आणि हे संकेत मोडणाऱ्यांवर योग्य कारवाई व्हायला हवीच, अशा शब्दांत ओबामा यांनी निर्धार व्यक्त केला.

शेवटची संधी
जगात कोणीही, कोठेही, कोणत्याही कारणासाठी रासायनिक अस्त्रांचा वापर करू नये, असे संयुक्त राष्ट्रांचे धोरण आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांना दोषी धरले पाहिजे, मात्र आमच्या पथकाचा अहवाल येईपर्यंत सीरियाला एक संधी देण्याची आवश्यकता आहे, असे संयुक्त राष्ट्रांच्या प्रमुख बान की मून यांनी सांगितले.