लष्करी तज्ज्ञांकडून कारवाईचे स्वागत

भारतीय लष्कराने बुधवारी पाकव्याप्त काश्मीरमध्ये घुसून ‘सर्जिकल स्ट्राइक’ कारवाई केल्यानंतर ही कारवाईचे योग्यच असल्याचे लष्करी तज्ज्ञांनी म्हटले आहे. भारताच्या सहनशीलतेची मर्यादा ओलांडल्यामुळेच या कारवाईची परिस्थितीची गरजच होती, असेही लष्करी तज्ज्ञांनी स्पष्ट केले.

लष्करी तज्ज्ञांनी भारतीय जवानांचे कौतुक केले असून तसेच सरकारने लष्कराला कारवाईची परवानगी देत दिर्घकालीन रखडलेली चर्चा पूर्ण केल्याचे म्हटले आहे. जवानांनी पाकिस्तानने हिसाकवलेल्या भारतीय भूमीत घुसून कारवाईला न्याय दिल्याचे मत तज्ज्ञांनी मांडले आहे.

केंद्र सरकारने लष्कराला कारवाई करण्याचे संपूर्ण अधिकार दिल्याचा आम्हाला आनंद आहे. यामुळे पाकिस्तानी लष्करालाही आमच्या कारवाईची कल्पना आली असेल. त्याचप्रमाणे ही कारवाई आम्ही भविष्यातही कायम राखू शकतो. भारतीय जवानांना अचूक माहिती देणाऱ्या गुप्तचर विभागाचे कौतुक करावे तेवढे कमी आहे. त्यांनी अचूक माहिती दिल्यामुळेच कारवाई करणे शक्य झाले. केंद्र सरकारनेही वेळ न दवडता अचूक निर्णय घेतल्याचे डीजी इन्फंट्रीचे माजी लेफ्टनंट जनरल एस. प्रसाद यांनी म्हटले.

पठाणकोट आणि उरीसारखे हल्ले केल्यानंतर भारताकडून अशी कारवाई करणे अत्यावश्यक होते, असे ‘रॉ’चे माजी प्रमुख सी. डी. सहाय यांनी स्पष्ट केले. भारताच्या सहनशीलतेची मर्यादा ओलांडल्यानंतर भारतीय जवानांनी सीमारेषा पार करून केलेली कारवाई अभिनंदनास पात्र आहे. ही केवळ एक कारवाई होती. त्यामुळे दोन्ही देशांतील तणाव आणखी न वाढवता भारतीय लष्कराला परतण्याचा आदेश देण्याची गरज असल्याचेही सहाय यांनी स्पष्ट केले.भारतीय लष्कराने बुधवारी रात्री केलेल्या कारवाईत पाकव्याप्त काश्मीरमधील दहशतवादी अड्डे उद्ध्वस्त केले आहेत.

‘‘जम्मू-काश्मीरमध्ये हल्ले करण्याच्या उद्देशाने नियंत्रण रेषेच्या पलीकडील तळांवर काही दहशतवादी गोळा झाल्याची खात्रीशीर गुप्त माहिती काल (बुधवारी) मिळाली होती. त्या आधारावर काल रात्री (बुधवारी रात्री आणि गुरुवारी पहाटे) भारतीय लष्कराने पाकव्याप्त काश्मीरमध्ये कारवाई करून त्या तळांवर हल्ला केला आणि ते उद्ध्वस्त केले. कारवाईत दहशतवाद्यांचे आणि त्यांना पाठिंबा देणाऱ्याचे मोठे नुकसान झाले आहे. दहशतवाद्यांचे तळ नष्ट करण्याची कारवाई थांबवण्यात आली आहे. कारवाई सुरू ठेवण्याची आपली योजना नाही. मात्र यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही परिस्थितीला तोंड देण्याची सेनादलांची संपूर्ण तयारी आहे.

मी पाकिस्तानी ‘डीजीएमओ’बरोबर संवाद साधला असून त्यांना भारताच्या काळजीबद्दल आणि कारवाईबद्दल माहिती दिली आहे. या प्रदेशात शांतता राखणे हेच भारताचे उद्दिष्ट आहे, मात्र आम्ही दहशतवाद्यांना नियंत्रण रेषेपलीकडून कारवाया करून भारतीय नागरिकांचे प्राण घेऊ देण्याची मोकळीक देऊ शकत नाही. जानेवारी २००४ मध्ये पाकिस्तानने त्यांच्या नियंत्रणाखालील भूप्रदेशाचा वापर भारताविरुद्ध दहशतवादी कारवायांसाठी वापरू देणार नाही असे वचन दिले होते. त्यानुसार या प्रदेशातून दहशतवादाच्या समस्येचा नायनाट करण्यास पाकिस्तानी लष्कर आम्हाला सहकार्य करेल अशी आशा आम्ही करतो.’’

पाकिस्तानपुरस्कृत दहशतवाद्यांनी उरी येथे केलेल्या हल्ल्याला प्रत्युत्तर म्हणून भारतीय लष्कराने गुरुवारी पहाटे पाकव्याप्त काश्मीरमध्ये कारवाई करून दहशतवाद्यांचे तळ उद्ध्वस्त केले. त्यासंदर्भात डायरेक्टर जनरल ऑफ मिलिटरी ऑपरेशन्स (डीजीएमओ) लेफ्टनंट जनरल रणबीर सिंग यांनी गुरुवारी नवी दिल्लीत घेतलेल्या पत्रकार परिषदेत केलेले निवेदन..(पत्रकार परिषदेला परराष्ट्र खात्याचे प्रवक्ते विकास स्वरूप हेदेखील उपस्थित होते.)