सीमेवर पाकिस्तानकडून सातत्याने शस्त्रसंधीचे सातत्याने उल्लंघन केले जात असून, घुसखोरीचेही प्रकार होत असल्याने लष्कराने छोटय़ा-छोटय़ा युद्धांसाठी सदैव तयार राहण्याची गरज असल्याचे सरसेनानी दलबीरसिंग सुहाग यांनी मंगळवारी येथे स्पष्ट केले. १९६५ मध्ये झालेल्या भारत-पाकिस्तान युद्धाबाबत तिन्ही दलांच्या संयुक्त चर्चासत्रात सुहाग बोलत होते.
छोटय़ा-छोटय़ा युद्धांना सामोरे जाण्यासाठी सदैव तयार राहावे लागेल आणि आता तो आपल्या रणनीतीचा एक महत्त्वाचा भाग असेल, असेही सरसेनानी म्हणाले. पाकिस्तानकडून सातत्याने शस्त्रसंधीचे उल्लंघन होत असल्याने भारतीय लष्कर अधिकाधिक सावध झाले आहे. आपल्यासमोरील आव्हाने अधिक गुंतागुंतीची झाली आहेत, असेही त्यांनी सांगितले.
सीमेवर सातत्याने पाकिस्तानकडून घुसखोरी होत असल्याने तेथे तणाव आहे, जम्मू-काश्मीरमध्ये अस्थिरता पसरविण्यासाठी नव्या पद्धतींचा अवलंब केला जात आहे, असे स्पष्ट करताना सुहाग यांनी अलीकडेच झालेल्या दहशतवादी घटनांचा संदर्भ दिला.
१९६५च्या युद्धामुळे भारतीय जवानांचा विश्वास दुणावला
नवी दिल्ली- पाकिस्तानसमवेत १९६५ मध्ये झालेल्या युद्धामुळे भारतीय जवानांमधील आत्मविश्वास दुणावला आणि त्यामुळे १९७१च्या युद्धातील विजयाचा पाया रचला गेला, असे सरसेनानी दलबीरसिंग सुहाग यांनी म्हटले आहे. ‘१९६५, टर्निग द टाइड : हाऊ इंडिया वन द वॉर’ या संरक्षणतज्ज्ञ नितीन गोखले लिखित पुस्तकात आणि सेंटर फॉर लॅण्ड वॉरफेअर स्टडिजने सरसेनानींच्या दाव्याला पाठिंबा दिला आहे.