सैन्यातही आता काही प्रमाणात राजकारण सुरु झाले असून सैन्याला नेहमीच राजकारणापासून दूर ठेवायला पाहिजे. सशक्त लोकशाहीसाठी हे गरजेचे असल्याचे लष्करप्रमुख बिपिन रावत यांनी म्हटले आहे. युनायटेड सर्विस इन्स्टिट्यूशन या संस्थेच्यावतीने आयोजित एका कार्यक्रमात ते बोलत होते.

रावत म्हणाले, आजवर आम्ही सैन्यात खूपच धर्मनिरपेक्ष वातावरणात ठेवले आहे. मात्र, आता सैन्यामध्ये काही प्रमाणात राजकारणाचा समावेश होऊ पाहत आहे. आपल्याकडे सशक्त लोकशाही असून त्यासाठी सैन्याला राजकारणापासून दूर ठेवायला पाहिजे. यावेळी त्यांनी आपल्या जुन्या आठवणींना उजाळा दिला. आमच्यावेळी सैन्यामध्ये स्त्रिया आणि राजकारण यावर कधीच बोलले जात नव्हते. मात्र, आता याच विषयावर सैन्यात मोठ्या प्रमाणावर चर्चा होऊ लागल्या असून हे टाळायलाच हवे असे रावत म्हणाले.

यासाठी जेव्हा एखाद्या लष्करी संस्थेचा किंवा अधिकाऱ्याचा राजकीय संस्थेशी संबंध येईल त्याक्षणी त्याला टाळायला हवे. राजकारण्यांकडून कोणत्याही प्रकारे सैन्यात हस्तक्षेप होत नाही तेव्हाच ते उत्कृष्ट कामगिरी करतात असे निरीक्षणही त्यांनी यावेळी नोंदवले.

दरम्यान, त्यांनी शहीद आणि अपंग जवानांच्या  मुलांच्या शिक्षणातील अडचणींबाबतही भाष्य केले. याबाबत आपण संरक्षणमंत्री निर्मला सीतारामन यांच्याशी पत्रव्यवहार केल्याचे त्यांनी सांगितले. त्याचबरोबर हा प्रश्न प्रधान्याने सोडवावा अशी विनंतीही त्यांना केल्याचे लष्करप्रमुख यावेळी म्हणाले.