X

रेल्वेत लवकरच एक दशलक्ष रोजगारनिर्मिती

आधुनिक ट्रॅकसाठी जागतिक निविदा

आधुनिक ट्रॅकसाठी जागतिक निविदा

रेल्वेत लवकरच एक दशलक्ष रोजगारनिर्मिती होणार असल्याचे सांगत रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांनी आधुनिक ट्रॅकसाठी जागतिक निविदा काढण्यात येणार असल्याचे स्पष्ट केले.

प्रवाशांची सुरक्षा ही रेल्वेची प्राथमिकता असल्याने त्याकरिता निधी देण्यावर कोणतीही मर्यादा नसल्याचेही ते यावेळी म्हणाले. मागील काही महिन्यांत सातत्याने रेल्वे दुर्घटना घडल्या असून काही जणांना प्राण गमवावे लागले आहेत.

सध्या असलेल्या सर्व ट्रॅकचे आधुनिकीकरण करण्यात येणार आहे. रेल्वे ट्रॅक वाढविण्याबरोबरच ते अधिक सुरक्षित ठरावेत यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत. तसेच त्याकरिता नव्या योजनाही राबविण्याचा विचार असल्याचे यावेळी गोयल यांनी सांगितले. जागतिक आर्थिक फोरमच्या भारतीय आर्थिक परिषदेत ते बोलत होते. ट्रॅक बदलण्याच्या नव्या उपक्रमामुळे देशात मोठय़ा प्रमाणावर रोजगाराची संधी निर्माण होईल. रेल्वेमुळे अगोदरच मोठय़ा प्रमाणावर रोजगार मिळत असतो. थेट रेल्वेमध्ये नोकऱ्या उपलब्ध होणार नसल्या तरी वेगवेगळ्या प्रकारे रोजगार देण्याचा प्रयत्न असल्याचे ते म्हणाले.

सुरक्षेला प्राधान्य..

रेल्वे ट्रॅकच्या विकासासाठी जागतिक निविदा मागविणार असल्याचेही ते म्हणाले. सुरक्षेच्या बाबतीत कोणतीही कसर केली जाणार नाही. सुरक्षा हीच भारतीय रेल्वेची प्राथमिकता आहे. पादचारी पूल, प्लॅटफॉर्म, प्रवेशद्वार आणि बाहेर पडण्याचा मार्ग या सर्व ठिकाणी सुरक्षेच्या दृष्टीने उपाययोजना करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. सध्या रेल्वे स्थानकांवर असलेल्या सर्व सुविधा शंभर वर्षे जुन्या असून त्या बदलण्याचे आव्हान असल्याचेही ते म्हणाले.

Outbrain