News Flash

करोना, चक्रीवादळानंतर आता टोळधाडींचे संकट; मध्य प्रदेशमधील १५ जिल्ह्यांमधील शेतकरी हैराण

टोळधाडींमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झालं आहे

प्रातिनिधिक फोटो (फोटो सौजन्य: असोसिएट प्रेस)

देशामधील करोनाग्रस्तांची संख्या वाढत असतानाच पूर्वेकडील पश्चिम बंगाल आणि ओडिशा राज्यांना अम्फन चक्रीवादळाचा फटका बसला आहे. अशातच महाराष्ट्राच्या शेजारील मध्य प्रदेश राज्यालाही एका नैसर्गिक संकटाला तोंड द्यावं लागत आहे. बुधवारी संध्याकाळी मध्य प्रदेशच्या पश्चिमेकडील १५ जिल्ह्यांमधील अनेक गावांवर टोळधाड पडली. मध्य प्रदेशमधील पानबिहार जिल्ह्यातील राणा हेडा गावातील झाडांवर हजारोच्या संख्येने टोळ दिसून आले. एवढ्या मोठ्या प्रमाणात टोळधाड पडल्याने भारताला स्वातंत्र्य मिळण्यापूर्वी राजस्थानमध्ये पडलेल्या टोळधाडींच्या आठवणी पुन्हा जाग्या झाल्या. या टोळीधाडीसंदर्भातील वृत्त आयएएनएस वृत्तसंस्थेने दिलं आहे.

पानबिहारमधील अनेक गावांमध्ये हजारोंच्या संख्येने टोळ दिसून आले. येथील रणहेरा गावात टोळांची संख्या इतकी होती की सरकारी यंत्रणांनी येथे औषध फवारणी केली.  या टोळांवर नियंत्रण मिळवण्यासाठी १२ स्वेअर किलोमीटरच्या परिसरात औषधांची फवारणी करण्यात आल्याची माहिती कृषी विभागाच्या उपसंचालिका नीलम सिंह यांनी दिली. हे टोळ राजस्थानमधून मध्य प्रदेशमध्ये आल्याचे कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. मध्य प्रदेशमधील उज्जैन, मंदसौर, नीमच, अगर-मालवा आणि इतर जिल्ह्यांमधील शेतकऱ्यांना या टोळधाडींचा फटका बसला आहे. पानबिहारबरोबरच नीमचच्या बाजूने पडलेल्या टोळधाडींमुळे हनुमंतिया, गुर्जर खेडी, खोर, नयागाव, केशरपुरा, कनका, सगराना या ठिकाणी शेतमालाचे मोठे नुकसान झाले आहे. याआधी टोळधाड कधीही न पाहिलेल्या शेतकऱ्यांमध्ये या हल्ल्यामुळे गोंधळाचे वातावरण निर्माण झालं आहे.

बुधवारी सकाळी शेतांवर मोठ्या संख्येने टोळधाडी पडताना पाहून सुरुवातील शेतकरी गोंधळले. त्यानंतर टोळांना पळवून लावण्यासाठी आणि पिकं वाचवण्यासाठी शेतकऱ्यांनी वेगवेगळ्या गोष्टी वाजवून आवाज करण्यास सुरुवात केली. काहींनी मशाली पेटवून शेतामध्ये धाव घेत पिकं वाचवण्याचा प्रयत्न केला. राजस्थानला लागून असलेल्या मध्य प्रदेशच्या सीमा भागामध्ये टोळांचे नऊ मोठे गट सक्रीय झाल्यची माहिती कृषी विभागाने दिली आहे.

जिरण तहसीलमधील बरखेडा गुर्जर, अर्निया बोराणा, सकराणी जागीर, धौकखेडा, कुचाडौड या गावांमध्येही टोळांनी मोठ्या संख्येने शेतमालाची नासधूस केली. मल्हागडमधून या टोळांनी मध्य प्रदेशमध्ये शिरण्यास सुरुवात केली. पाहता पाहता काही तासांमध्ये  भाऊसाखेडा, निनोरा, खोखरा, अमरपुरा गावांमध्ये हे टोळ पोहोचले. येथील शेतकऱ्यांनी ढोल, डीजे वाजवून या टोळांना पळवून लावण्याचा प्रयत्न केला. नंतर या टोळांनी सोनी, खोख्रा, निनोरा, चांदवासा अशा अनेक गावामध्ये नुकसान केलं. बुधवारी रात्री हे टोळ मुल्तानपुरा, गुरडिया देडा येथील शेतांमध्ये दिसून आले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 22, 2020 1:00 pm

Web Title: millions of desert locust attack in 15 madhya pradesh districts scsg 91
Next Stories
1 संकटकाळातही ‘ही’ कंपनी देणार दीड लाख कर्मचाऱ्यांना बोनस; कर्मचाऱ्यांचीही भरती होणार
2 करोना रुग्णांच्या संख्येत सर्वात मोठी वाढ, २४ तासात ६०८८ नवे रुग्ण; रुग्णसंख्या १,१८,४४७ वर
3 कर्जदारांना दिलासा, हप्ता न भरण्याची मुभा तीन महिन्यांनी वाढवली
Just Now!
X