लोकसभा निवडणुकीत भाजपाला मिळालेला विजय आणि केंद्रीय मंत्रिमंडळातील खातेवाटपाच्या पार्श्वभूमीवर एमआयएमचे प्रमुख आणि खासदार असदुद्दीन ओवेसी यांनी टीकास्त्र सोडले आहे. ३०० जागांवर विजय मिळाल्याने आता मनमानी करता येईल, असे जर भारताच्या पंतप्रधानांना वाटत असेल तर हे शक्य होणार नाही. संविधानासाठी मी मोदींविरोधात उभा राहणार, गोरगरीबांच्या हक्कासाठी आणि न्यायासाठी ओवेसी उभा राहणार, असे त्यांनी म्हटले आहे.

ओवेसी यांनी शुक्रवारी हैदराबादमधील सभेत नरेंद्र मोदींवर टीका केली. भारताच्या पंतप्रधानांना ३०० जागांवर विजय मिळाल्याने आता मनमानी करता येईल असे वाटत असेल तर ते चुकीचे आहे. त्यांना मनमानी करता येणार नाही, हा ओवेसी त्यांच्याविरोधात जनतेच्या बाजूने उभा राहणार, अशी ग्वाही त्यांनी दिली. आम्ही देशाला कायम प्रगतीपथावर नेऊ, हैदराबादमध्ये सर्व जण समान असून कोणीही भाडेकरु नाही, असे ते म्हणालेत.

यापूर्वीही ओवेसी यांनी मोदींवर टीका केली होती. भाजपा सत्तेत आल्याने देशातील मुस्लिमांनी घाबरु नये, भारताच्या संविधानाने प्रत्येकाला धर्मस्वातंत्र्याचा अधिकार दिला आहे, असे त्यांनी सांगितले.

काही दिवसांपूर्वी बिहारमधील बेगुसरायमध्ये धर्माच्या नावावर हिंसा झाल्याचा प्रकार समोर आला होता. येथील मोहम्मद कासिम या मुस्लीम तरुणाला गोळ्या घालून ठार मारण्याचा प्रयत्न झाला. त्या तरूणाचा व्हिडीओ एआयएमआयएम प्रमुख आणि खासदार असदुद्दीन ओवेसी यांनी रिट्विट करत भाजपा नेतृत्वाला लक्ष्य केले होते. त्यांच्यालेखी आम्ही माणसं नाहीत, अशी संतप्त प्रतिक्रिया ओवेसींनी दिली होती. भाजपाच्या नेत्यांनी आम्हाला पाकिस्तानशी जोडून आमचं नेहमीच खच्चीकरण केलं आहे, असेही ते ट्विटमध्ये म्हणाले होते.