एमआयएमचे प्रमुख असदुद्दीन ओवेसी यांनी पाकिस्तानवर पुन्हा एकदा सडकून टीका केली आहे. शनिवारी हैदराबादमध्ये एक जनसभेला संबोधित करताना त्यांनी पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांना खडेबोल सुनावले. तुम्ही अणुबॉम्ब बद्दल बोलता. आमच्याकडे अणुबॉम्ब नाहीये असं वाटतं का? असा सवाल त्यांनी इम्रान खान यांना विचारला. तुम्ही आधी जैश-ए-मोहम्मद, लश्कर-ए-तोयबाचा  खात्मा करा.

पाकिस्तानच्या संसदेमध्ये बसून तुम्ही टिपू सुलतान, बहादुर शाह जफर यांच्याबद्दल बोलता. टिपू सुलतान हे हिंदुंचे शत्रू नव्हते. त्यांच्या साम्राज्याच्या विरोधात जे होते मग ते कुठल्याही धर्माचे असतो ते त्यांचे शत्रू होते. कधीतरी हे सुद्धा वाचा असा टोला त्यांनी इम्रान यांना लगावला.मागच्या आठवडयात मुंबईतील शिवाजी पार्क मैदानातील सभेमध्ये बोलताना त्यांनी पाकिस्तानवर सडकून टीका केली होती.

पुलवामा दहशतवादी हल्ल्याला संपूर्णपणे पाकिस्तान जबाबदार आहे. पाकिस्ताननेच कट रचून हा हल्ला घडवून आणला. पाकिस्तानवर कारवाई झाली पाहिजे. हा हल्ला घडवणारी जैश-ए-मोहम्मद माझ्या दृष्टीने जैश-ए-शैतान आहे. मसूद अजहर मौलाना नाही तर सैतान आहे अशा शब्दात ओवेसींनी पाकिस्तानवर हल्लाबोल केला होता.

पाकिस्तानातील राजकारण्यांनी हिंदुस्थानातल्या मुस्लिमांची चिंता करु नये. आम्ही मोहम्मद अली जिना यांना त्याचवेळी धुडकावलं आणि हिदुंस्थानला निवडल आहे हे लक्षात ठेवा असे त्यांनी सुनावले होते. भारतीय हवाई दलाचे विंग कमांडर अभिनंदन वर्थमान पाकिस्तानच्या ताब्यात असताना त्यांनी पाकिस्तानला जीनेव्हा करार आणि त्यातल्या कलमाची आठवण करुन दिली होती.