News Flash

उद्धव ठाकरेंना हिंदुत्वाची आठवण करुन देणाऱ्या राज्यपालांवर ओवेसी संतापले, म्हणाले…

"राज्यपालांकडून अशा पद्धतीचं वक्तव्य येणं दुर्दैवी"

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना मंदिरं उघडण्यासंबंधी लिहिलेल्या पत्रात हिंदुत्वाची आठवण करुन देण्यावरुन एमआयएमचे खासदार असदुद्दीन ओवेसी यांनी संताप व्यक्त केला आहे. ओवेसी यांनी ट्विटरच्या माध्यमातून प्रतिक्रिया दिली असून शपथ घेताना हिंदुत्वाच्या चाचणीची गरज नाही असं म्हटलं आहे. तसंच राज्यपालांकडून अशा पद्धतीचं वक्तव्य येणं दुर्दैवी असल्याचंही ते म्हणाले आहेत.

ओवेसी यांनी ट्विटरला राज्यपालांनी मुख्यमंत्र्यांना लिहिलेलं पत्र शेअर केलं आहे. यावेळी त्यांनी लिहिलं आहे की, “राज्यघटनेची शपथ घेणाऱ्या व्यक्तीकडून अशा पद्धतीची गोष्ट येणं दुर्दैवी आहे. त्या शपथेला हिंदुत्वाच्या चाचणीची गरज नाही. मुख्यमंत्र्यांची हिंदुत्वाशी असलेली वचनबद्धता कर्तव्याशी जोडण्याचा संबंध येत नाही तसंच ते उपस्थितही केलं जाऊ नये”.

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी मंदिर खुली करण्याच्या मुद्यावरून उद्धव ठाकरेंना पत्र पाठवलं आहे. “एकीकडे सरकार बार, रेस्टॉरंट खुले करत आहेत. तर देवीदेवतांना मात्र अजूनही लॉकडाउनमध्येच ठेवलं आहे. मागील तीन महिन्याच्या काळात अनेक शिष्टमंडळांनी या संदर्भात माझी भेट घेतली आहे. तुम्ही हिंदुत्वाचे कट्टर समर्थक आहात. तुम्ही हे सार्वजनिकरित्या मान्यही करता. मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर तुम्ही आयोध्येलाही गेला होता. तुम्ही पंढरपूरला जाऊन विठ्ठल रुख्मिणीचीही पूजा केली. अनेक राज्यात मंदिर खुली करण्यात आली असून, महाराष्ट्रातही करोना मार्गदर्शक सूचनाची अमलबजावणी करून मंदिर खुली करण्यात यावी,” असं राज्यपालांनी पत्रात म्हटलं आहे.

राज्यपालांच्या पत्राला मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी उत्तर दिलं आहे. “प्रार्थनास्थळे उघडण्याबद्दलचे पत्र मिळाले. या बद्दल सरकार जरूर विचार करत आहे. जनतेच्या भावना, श्रद्धा जपताना त्यांच्या जिवाची काळजी घेणे हे आमच्या सरकारचे प्रथम कर्तव्य आहे आणि म्हणूनच करोनाशी लढताना जसा एकदम लॅाकडाऊन करणे चुकीचे तसेच तो एकदम उठवणेही अयोग्यच. आपण या पत्रात माझ्या हिंदुत्वाचा जो उल्लेख केला आहे, तो योग्यच आहे. मात्र माझ्या हिंदुत्वाला आपल्या प्रमाणपत्राची आवश्यकता नाही. तसेच ते कोणाकडून शिकण्याचीही मला गरज नाही. माझ्या राज्याला अथवा माझ्या राज्याच्या राजधानीला पाकव्याप्त काश्मीर म्हणणाऱ्यांचं हसत खेळत घरात स्वागत करणे हे माझ्या हिंदुत्वात बसत नाही,” असं उद्धव ठाकरे यांनी पत्रात म्हटलं आहे.

“Have you suddenly turned ‘Secular’ yourselves, the term you hated? असा प्रश्न आपल्याला का पडावा? केवळ धर्मस्थळे उघडणे म्हणजे हिंदुत्व आणि न उघडणे म्हणजे Secular असे आपले म्हणणे आहे का? मग आपण राज्यपालपदाची शपथ ज्या घटनेनुसार घेतलीत, त्या घटनेचा महत्वाचा गाभा ‘Secularism’ आहे, तो आपल्याला मान्य नाही का?,” असा सवालही उद्धव ठाकरेंनी विचारला आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 13, 2020 6:51 pm

Web Title: mim mp asaduddin owaisi on maharashtra governor bhagat singh koshyari letter to cm uddhav thackeray temple hindutva sgy 87
Next Stories
1 ऐकावं ते नवलच – बिहारमधील दरभंगा पोलिसांनी चौथीच्या पोराला पाठवली नोटीस …
2 क्रौर्याचा कळस – घरात झोपलेल्या तीन अल्पवयीन बहिणींवर अ‍ॅसिड हल्ला
3 “काँग्रेस हा मानसिक संतुलन ढासळलेल्यांचा पक्ष”
Just Now!
X