वरिष्ठ काँग्रेस नेते पी. चिदंबरम यांनी लष्करप्रमुख जनरल बिपिन रावत यांच्यावर अत्यंत बोचरी टीका केली आहे. लष्करप्रमुखांनी सुधारित नागरिकत्व कायद्यावरुन सुरु असलेल्या हिंसक आंदोलनावर भाष्य केल्यामुळे चिदंबरम यांनी त्यांना लक्ष्य केले.

काय म्हणाले होते बिपिन रावत ?
‘‘जे लोक लोकांना चुकीच्या दिशेने जाण्यासाठी प्रवृत्त करतात, ते नेते नव्हेत. सध्या मोठय़ा संख्येत विद्यापीठातील आणि महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या बाबतीत असेच घडत आहे. काही लोक जमावाला आपल्या शहरांमध्ये जाळपोळ आणि हिंसाचार करण्यासाठी प्रवृत्त करत आहेत. हे काही नेतृत्व नव्हे,’’ असे लष्करप्रमुख म्हणाले होते.

चिदंबरम यांनी काय टीका केली?
आता लष्करप्रमुखांना बोलायला सांगितले जाते. हे लष्करप्रमुखांचे काम आहे? असा सवाल चिदंबरम यांनी केला. डीजीपी, लष्करप्रमुखांना सरकारला पाठिंबा द्यायला सांगितले जाते. ही लाजिरवाणी बाब आहे. मी लष्करप्रमुखांना आवाहन करु इच्छितो कि, “तुम्ही लष्कराचे नेतृत्व करा आणि तुम्ही तुमचे काम पाहा. राजकारणी त्यांना काय करायचे आहे ते स्वत: ठरवतील.”

राजकारण्यांनी काय करायचे हे सांगणे लष्कराचे काम नाही. युद्ध कसे लढायचे हे तुम्हाला सांगणे आमचे काम नाही, तुम्ही तुमच्या रणनितीनुसार युद्ध लढता त्याप्रमाणे आम्ही आमचे राजकारण सांभाळू” असे चिदंबरम म्हणाले.
तिरुअनंतपूरममध्ये राज भवनाच्यासमोर केरळ प्रदेश काँग्रेस समितीने आयोजित केलेल्या ‘महा रॅली’मध्ये चिदंबरम बोलत होते.