जम्मू काश्मीरमधील अनुच्छेद ३७० रद्द केल्यानंतर आता तीन महिन्यांचा कालावधी लोटला असून सोमवारी शहरात काही रस्त्यांवर मिनी  बस सुरू करण्यात आल्या. रेल्वेनेही श्रीनगर-बारामुल्ला पट्टय़ात सेवेची चाचणी घेतली आहे. मंगळवारी रेल्वेसेवा सुरू करण्यात येणार आहे. ५ ऑगस्टला अनुच्छेद ३७० रद्द केल्यापासून त्या भागात रेल्वे सेवा रद्द करण्यात आली होती.

रेल्वेच्या एका अधिकाऱ्याने सांगितले,की रेल्वेने या भागात तीन महिन्यानंतर प्रथमच सेवेची चाचणी घेतली आहे. श्रीनगर-बारामुल्ला रेल्वे सेवा उद्यापासून सुरू करण्यात येईल, तर श्रीनगर-बनीहाल रेल्वे सेवा त्यानंतर काही दिवसात सुरक्षा तपासणीनंतर सुरू करण्यात येईल. रेल्वेने सोमवारी या पट्टय़ांमध्ये दोन चाचण्या घेऊन सुरक्षा तपासणी केली होती.

अनुच्छेद ३७० रद्द केल्यानंतर जे र्निबध लावण्यात आले होते त्यामुळे रेल्वे व बस सेवा ठप्प झाली होती. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार सोमवारी  काही मिनी बस बटवारा-बाटमालू दरम्यान सुरू करण्यात आल्या. आंतर जिल्हा कॅब व ऑटोरिक्षा सेवा  पुन्हा सुरू झाली आहे. खासगी वाहतूक सेवा काही भागात सुरू असून वाहतूक नियंत्रणासाठी अतिरिक्त पोलिस तैनात करण्यात आले आहेत. बाजारपेठा काही काळ सुरू करण्यात आल्या पण दुपारनंतर दुकाने बंद झाली.

प्रीपेड मोबाईल फोन व इंटरनेट सेवा अजूनही बंद आहे. फुटीरतावादी व इतर राजकीय नेते यांना नजरकैदेत ठेवण्यात आले आहे. माजी मुख्यमंत्री फारूख अब्दुल्ला , ओमर अब्दुल्ला व मेहबुबा मुफ्ती अजून नजरकैदेत आहेत.  दरम्यान, जम्मू-काश्मीरमध्ये राजकीय हालचाली सुरू कराव्या आणि स्थानबद्धतेत असलेल्या सर्व राजकीय नेत्यांची सुटका करावी, अशी मागणी नॅशनल कॉन्फरन्सने (एनसी) सोमवारी पुन्हा एकदा केली. राजकीय नेत्यांची स्थानबद्धता लोकशाहीविरोधी असल्याचे एनसीचे सचिव रतनलाल गुप्ता यांनी म्हटले आहे. केंद्र सरकारने जम्मू-काश्मीरचा विशेष दर्जा रद्द केल्यापासून नेत्यांना आणि इतरांना ताब्यात ठेवले आहे त्यांची सुटका करणे अत्यावश्यक आहे, असेही गुप्ता यांनी म्हटले आहे.

दरम्यान, बर्फवृष्टीमुळे फळबागांचे अतोनात नुकसान झाले असल्याने त्याची पाहणी करून बाधितांना नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणीही त्यांनी केली.

चकमकीत २ दहशतवादी ठार

श्रीनगर : जम्मू-काश्मीरमध्ये रविवार आणि सोमवारी सुरक्षा दलांसमवेत झालेल्या दोन चकमकींमध्ये दोन दहशतवादी ठार झाल्याचे पोलिसांनी सांगितले. बंदिपोरा जिल्ह्य़ात सोमवारी सकाळी झालेल्या चकमकीत एक दहशतवादी ठार झाला तर श्रीनगरपासून ५५ कि.मी. अंतरावर असलेल्या लावदरा येथे रविवारी झालेल्या चकमकीत एक दहशतवादी ठार झाला, असे पोलिसांनी सांगितले. दहशतवादी लपून बसल्याची खबर मिळाल्यावरून पोलिसांनी शोधमोहीम हाती घेतली असताना ही चकमक उडाली.