१६ जुलैपर्यंत मुदिया पोनो यात्रा चालणार

येथील मिनी कुंभ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मुदिया पोनो यात्रेच्या पहिल्या दिवशी पाच लाख भाविकांनी गोवर्धन पर्वताची परिक्रमा पूर्ण केली. एकूण पाच दिवस ही यात्रा चालते. सनातन गोस्वामींच्या कृष्णाप्रतिच्या भक्तीचे प्रतीक म्हणून ही परिक्रमा केली जाते.

१२ जुलै रोजी ही यात्रा सुरू झाली असून ती १६ जुलैपर्यंत चालणार आहे. शनिवापर्यंत भाविकांची संख्या १० लाखांपर्यंत जाण्याची शक्यता आहे, अशी माहिती सहायक जिल्हा दंडाधिकारी सतीश कुमार त्रिपाठी यांनी दिली. यात्रा बारा जुलैला सुरू झाली असली तरी काही भाविकांनी गोवर्धन परिक्रमा पूर्ण केली आहे. यात्रेचा परिसर फुलून गेला असून वृद्धांसाठी हेलिकॉप्टरमधून परिक्रमेची सोय करण्यात आली आहे. हेलिकॉप्टरमध्ये एकावेळी सात लोक बसू शकतात. त्यात परिक्रमेला केवळ नऊ मिनिटे लागतात. यासाठी प्रती व्यक्ती तीन हजार रुपये आकारण्यात येतात, असे जिल्हा पर्यटन अधिकारी डी.के.शर्मा यांनी सांगितले. शनिवारी  दुपापर्यंत ५६ जणांनी हेलिकॉप्टर सेवेचा वापर केला होता.

या वर्षी लोकसुविधांना प्राधान्य देण्यात आले असून विविध मार्गावर १५०० बस सोडण्यात आल्या आहेत. यात्रेचा परिसर सात महा विभागात असून त्यात २१ विभाग व ६२ उपविभाग आहेत. मोठय़ा विभागावर अतिरिक्त जिल्हा दंडाधिकारी देखरेख करीत आहेत, तर लहान विभागात उपविभागीय दंडाधिकारी किंवा वरिष्ठ उप जिल्हाधिकारी देखरेख करीत आहेत. यात्रेत प्लास्टिकवर बंदी घालण्यात आली असून १५ सरकारी व दोन खासगी वैद्यकीय केंद्रे अहोरात्र काम करीत आहेत.

१७ चलत स्वच्छतागृहे व २० पाण्याचे टँकर उपलब्ध केले असून बंदोबस्तासाठी २५०० पोलिस तैनात केले आहेत, असे वरिष्ठ पोलीस अधीक्षक शलभ माथूर यांनी सांगितले. परिक्रमा मार्गावर २१ चौक्या उभारल्या असून साध्या वेशातील पोलीस गस्त घालत आहेत. मथुरा-कासगंज व मथुरा-अल्वर अशा दोन रेल्वेगाडय़ा या निमित्ताने सुरू केल्या आहेत, असे आग्रा येथील रेल्वेचे जनसंपर्क अधिकारी एस.के.श्रीवास्तव यांनी सांगितले.