नरेंद्र मोदी सरकार मधील एका ज्येष्ठ मंत्र्याला पोरबंदर न्यायालयाने आज शनिवारी तीन वर्षे कैदेची शिक्षा दिली. या मंत्र्यावर २००६ साली ५४ कोटींच्या अवैध कोळसा खाण प्रकरणी खटला दाखल करण्यात आला होता.
गुजरातचे जल स्त्रोत मंत्री बाबू बोखिरीया यांना अवैध खाण खटल्यामध्ये दोषी धरत पोरबंदरचे मुख्य न्यायदंडाधिकारी सी. व्ही. पाड्या यांनी तीन वर्षे कैदेची शिक्षा दिली. बोखिरीयांबरोबर या खटल्यातील इतर आरोपी कॉंग्रेसचे माजी खासदार भारत ओडेदरा, एका खुनाच्या गुन्ह्यात शिक्षा भोगत असलेला माफिया भिमा दुला ओडेदरा आणि त्याचा मुलगा लक्ष्मण ओडेदरा यांना देखील तीन वर्षे कैद व प्रत्येकी ५००० रूपये दंडाची शिक्षा करण्यात आली.
सौराष्ट्र रासायनिक उद्योगाचे व्यवस्थापक उमेश भंवसरा यांनी २००६ मध्ये या चौघांविरोधात तक्रार दाखल केली होती. बाबू बोखिरीया यांनी २०१२ ला गुजरात विधानसभेच्या निवडणुकीमध्ये कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अर्जुन मोधवाडीया यांचा पराजय केला होता. नरेंद्र मोदीं यांनी बोखिरीया यांना कॅबिनेट मंत्रीपद देऊन आपल्या मंत्री मंडळामध्ये  घेतले आहे.