भारतातील ‘लाल फितीचा जमाना आता संपला. उद्योजकांचे, गुंतवणूकदारांचे आम्ही मनापासून स्वागत करू इच्छितो, त्यांच्यासाठी लाल गालिचा अंथरू इच्छितो’, अशा शब्दांत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जपानी उद्योग जगताने भारतात यावे म्हणून आवाहन केले. भारताला उत्पादन क्षेत्रात भरारी घ्यायची आहे आणि त्यासाठी तुमचे सहकार्य गरजेचे आहे, असेही पंतप्रधान म्हणाले.
निक्की व जपानमधील व्यवसाय प्रसार संस्था जेट्रो यांनी संयुक्त विद्यमाने आयोजित केलेल्या उद्योग चर्चासत्रात भारतीय पंतप्रधानांनी येथील उद्योग विश्वाशी मनमोकळा संवाद साधला. ‘मेड इन इंडिया’विषयी असलेल्या आपल्या संकल्पना त्यांनी उद्योजकांसमोर मांडल्या. तसेच गेल्या १०० दिवसांमध्ये व्यवसायास पूरक ठरणारे कोणते निर्णय आपल्या सरकारने घेतले याची उदाहरणेही दिली.
‘उत्पादन खर्च कमी व्हावा यापेक्षा उत्पादकांची वेगळी अपेक्षा काय असते? स्वस्त आणि कौशल्यसंपन्न कामगार, व्यवसायाची मुक्तता आणि उदार वातावरण यापुढे तुम्हाला भारतात पाहायला मिळेल. एकदा आपले नशीब आजमावण्यासाठी आमच्या देशात गुंतवणूक करा आणि काय जादू घडते ती पहा’, असे आवाहनच नरेंद्र मोदी यांनी केले.

गुंतवणुकीसाठी खाण
 भारतात अब्जावधी डॉलर्सच्या गुंतवणुकीची गरज आहे. मोबाईल हँडसेटची बाजारपेठेत मोठी क्षमता आहे. ५० शहरात मेट्रो, अपारंपरिक ऊर्जा प्रकल्पांची उभारणी, इलेक्ट्रोनिक बाजारपेठ अशा क्षेत्रात मोठी संधी आहे. जपानच्या सहकार्याशिवाय भारत अपूर्ण आहे व भारताशिवाय जपान अपूर्ण आहे. त्यामुळे दोन्ही देशांनी आर्थिक आघाडीवर एक नवा इतिहास घडवावा असे आपल्याला वाटते. दुसऱ्या कुठल्याही सरकारने जे केले नाही ते कमी कालावधीत आम्ही केले व निर्णय प्रक्रिया जलद केली. भारतात तुमचे स्वागतच आहे. तुम्हाला ज्या सुविधा लागतील त्या आम्ही देऊ, असे आवाहन मोदी यांनी उद्योग जगताला केले.