देशात सध्या करोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढत आहे. अशा परिस्थितीत केंद्र सरकारनं १४ एप्रिल पर्यंत म्हणजेच २१ दिवस संपूर्ण देशात लॉकडाउन घोषित केला आहे. दरम्यान. यानंतर केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी देशातील टोल नाक्यांवर तात्पुरता टोल बंद करण्याचा निर्णय घेतला आहे.आपात्कालिन सेवांना काम करण्यास कोणतीही अडचण येऊ नये यासाठी राष्ट्रीय महामार्गांवर तात्पुरत्या स्वरूपात टोल बंद करण्याचा निर्णय घेतल्याची माहिती गडकरी यांनी दिली. यामुळे आपात्कालिन सेवा देणाऱ्यांच्या वेळेचीही बचत होईल, असं ते म्हणाले. त्यांनी ट्विटरवरून यासंदर्भातील माहिती दिली.

आवश्यक त्या ठिकाणी रस्त्यांच्या दुरूस्तीचं काम आणि टोल नाक्यांवरील आपात्कालिन सेवा सुरू राहणार असल्याचं गडकरी म्हणाले. सध्या देशभरात सुरू असलेल्या लॉकडाउनच्या पार्श्वभूमीवर महामार्ग आणि त्यांच्या राज्यांच्या सीमा सील करण्यात आल्या आहेत. केवळ आपात्कालिन वाहनांनाच ये-जा करण्याची परवानगी असते. याव्यतिरिक्त केवळ जीवनावश्यक वस्तूंची ने-आण करणारे ट्रक, सरकारी वाहनं आणि रुग्णवाहीकांनाच जाण्याची परवानगी आहे. योग्य ते कारण दिल्यासच खासगी वाहनांना पोलिसांकडून जाण्यायेण्याची परवानगी देण्यात येते.

१४ एप्रिलपर्यंत लॉकडाऊन
करोना व्हायरसचं संक्रमण रोखण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २१ दिवसांचा म्हणजे १४ एप्रिलपर्यंत लॉकडाउन जाहीर केला आहे. यादरम्यान नागरिकांना अत्यावश्यक सेवा पुरवण्यात येणार आहेत. आपल्याला करोना व्हायरसची साखळी तोडायची आहे. देशव्यापी लॉकडाउननं तुमच्या घरावर एक लक्ष्मण रेषा आखली आहे. तुम्हाला तुमचं घराबाहेरील एक पाऊल करोना तुमच्या घरात आणू शकतं, असं मोदी म्हणाले होते.