नरेंद्र मोदी यांनी २०१४ मधील लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात नोकरीचे आश्वासन दिलेच नव्हते. त्यांनी तरुणांना रोजगार उपलब्ध करुन देण्याचे आश्वासन दिले होते असे विधान भाजपाचे वरिष्ठ नेते आणि केंद्रीय अर्थराज्यमंत्री शिवप्रताप शुक्ला यांनी केले आहे. वाढती महागाई आणि घसरणारा विकास दर ही जगभरातील समस्या असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

केंद्रीय अर्थराज्य मंत्री शिवप्रताप शुक्ला यांनी ‘नवभारत टाइम्स’ या हिंदी दैनिकाला मुलाखत दिली. यात त्यांना मोदी सरकार नोकरीचे आश्वासन पूर्ण करण्यात अपयशी झाले का असा प्रश्न विचारण्यात आला. यावर शुक्ला म्हणाले, मोदींनी लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात दरवर्षी १ कोटी तरुणांना रोजगार देण्याचे आश्वासन दिले होते. त्यांनी नोकरीचे आश्वासन कधीच दिले नव्हते. नोकरी म्हणजे सरकारी नोकरी नसून तरुणांना रोजगार देण्याचे आश्वासन त्यांनी दिले होते. एका कार्यक्रमानिमित्त मुंबईत आले असताना त्यांनी ही मुलाखत दिली.

मोदींच्या मुद्रा योजनेमुळे सुमारे १० कोटींपेक्षा जास्त तरुणांना कर्ज देऊन त्यांना रोजगार देण्यात आला. स्टार्टअप योजनांमुळे देशाचा फायदा होत असून महिलांसाठीही विशेष योजना सुरु झाल्या आहेत. यामुळे गावातील महिला देखील दररोज ५०० ते ६०० कमवू शकतात, असे त्यांनी सांगितले.

लोकसभा निवडणुकीत मोदींनी काळा पैसा परत आणल्यास प्रत्येक भारतीयाच्या खात्यात १५ लाख रुपये जमा होतील असे आश्वासन दिले होते. मात्र हा निवडणुकीतील ‘जुमला’ होता, असे भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी सांगितले होते. तर अच्छे दिन येण्यासाठी आणखी २५ वर्ष लागतील, असेही शहा यांनी म्हटले होते. आता शुक्ला यांनी देखील असे विधान केल्याने भाजपवर टीका होत आहे.