News Flash

जाणून घ्या, कोण आहेत मध्य प्रदेशमध्ये राज्यमंत्रिपदाचा दर्जा मिळालेले कॉम्प्युटर बाबा

१९८० वा १९९० च्या दशकात ‘सियाराम शर्ट्स’च्या जाहिरातींमध्ये दिसणारा देखणा तरुण म्हणजे भय्यू महाराज

स्वामी नामदेव त्यागी यांना कॉम्प्युटर बाबा म्हणून ओळखले जाते.

मध्य प्रदेशमधील विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर शिवराजसिंह चौहान यांनी पाच धार्मिक नेत्यांना राज्यमंत्रिपदाचा दर्जा देण्याचा निर्णय घेतला आहे. यात कॉम्प्युटर बाबा, नर्मदानंद महाराज, भय्यू महाराज, हरिहरानंद महाराज, पंडित योगेंद्र महंत यांचा समावेश आहे. नेमके कोण आहेत हे धार्मिक नेते याचा घेतलेले हा आढावा…

> कॉम्प्युटर बाबा

स्वामी नामदेव त्यागी यांना कॉम्प्युटर बाबा म्हणून ओळखले जाते. कॉम्प्युटरसारखं डोकं चालत असल्याने ते या नावाने प्रसिद्ध असल्याचे त्यांचे समर्थक सांगतात. कॉम्प्युटर बाबांसोबत नेहमी लॅपटॉप असतो. याशिवाय त्यांच्याकडे नवीन उपकरणे, वाय- फाय सुविधा, अत्याधुनिक तंत्रज्ञान असलेला मोबाईल देखील आहे. त्यांच्याकडे हेलिकॉप्टर असून २०१३ मधील कुंभमेळ्यात हेलिकॉप्टरने येण्याची परवानगी द्यावी, अशी मागणी त्यांनी जिल्हा प्रशासनाकडे केल्याने ते चर्चेत आले होते.

विशेष म्हणजे, यापूर्वी याच कॉम्प्युटर बाबा यांनी नर्मदा घोटाळा यात्रेचे आयोजन केले होते. या यात्रेत नर्मदेत झालेल्या भ्रष्टाचाराची पोलखोल करु, असे त्यांनी सांगितले होते. १ एप्रिल ते १५ मे या कालावधीत ही यात्रा निघणार होती. मात्र, कॉम्प्युटर बाबा यांनी तडकाफडकी ही यात्रा रद्द केली आणि आता त्यांनाच राज्यमंत्रिपदाचा दर्जा मिळाला आहे. नर्मदा प्रकल्पात सरकारने कोट्यवधी वृक्षांची लागवड केली, असा दावा केला गेला. मात्र, हा दावा खोटा असल्याचे त्यांचे म्हणणे होते.

> भय्यू महाराज
१९८० – ९० च्या दशकात ‘सियाराम शर्ट्स’च्या जाहिरातींमध्ये दिसणारा देखणा तरुण म्हणजे उदयसिंह देशमुख. हा तरुण पुढे अध्यात्माकडे वळला. म्हणता म्हणता तो आध्यात्मिक गुरू बनला. राज्यकर्ते, राजकारणी, उद्योगपती त्यांच्या दर्शनासाठी रांगा लावू लागले. हे आध्यात्मिक गुरू म्हणजे उदयसिंह देशमुख ऊर्फ भय्यू महाराज. मध्य प्रदेशमधील इंदौरजवळ भय्यू महाराजांचा मोठा आश्रम आहे. २०११ मध्ये अण्णा हजारेचे आंदोलन मागे घेण्यात भय्यू महाराज यांची महत्त्वाची भूमिका निभावली होती. सर्वपक्षीय नेते त्यांचे शिष्य  आहेत.

> हरिहरानंदजी

नमामी देवी नर्मदे सेवा यात्रा सुरु करणाऱ्या कोअर टीममध्ये हरिहरानंदजी यांचा समावेश होतो. ११ डिसेंबर २०१६ रोजी ही यात्रा सुरु झाली आणि ११ मे २०१७ रोजी ही यात्रा संपली. या यात्रेदरम्यान १४४ दिवस पायी प्रवास करत हरिहरानंदजी यांनी पाणी वाचवा आणि अन्य विषयांवर सामाजिक प्रबोधन केले होते.

> पंडित योगेंद्र महंत

पंडित योगेंद्र महंत यांनी भाजपाविरोधात नर्मदा घोटाळ्यावरुन आवाज उठवला होता. मध्य प्रदेशमधील १५ जिल्ह्यांमध्ये त्यांनी यात्रा देखील काढली होती. नर्मदा हरियाली प्रकल्पाच्या नावाखाली राज्य सरकार कोट्यवधी रुपये झाडे लावण्यासाठी खर्च करत आहे. पण सरकार जनतेची फसवणूक करत असल्याचा आरोप त्यांनी सरकारवर केला होता.

> नर्मदानंदजी

नर्मदानंदजी महाराज हे मध्य प्रदेशमधील धार्मिक नेते आहेत. हनुमान जयंती आणि राम नवमीनिमित्त ते यात्रेचे आयोजन करतात. गेल्या वर्षी त्यांनी राज्याच्या विविध भागात शोभायात्रा देखील काढल्या होत्या.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 4, 2018 2:43 pm

Web Title: minister of state status in madhya pradesh who is computer baba bhaiyyuji maharaj narmadanandji
Next Stories
1 “पाकड्यांनो जरा भारतीयांकडून बोध घ्या” – दुबईचे लेफ्टनंट जनरल
2 पाकिस्ताननं लुडबूड करणं थांबवावं, मधुर भांडारकरने आफ्रिदीला सुनावले खडे बोल
3 निवडणूक आयोगाचा ‘एक जागा, एक उमेदवार’ मागणीला पाठिंबा; सुप्रीम कोर्टात प्रतिज्ञापत्र सादर
Just Now!
X