काही दिवसांपूर्वीच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या मंत्र्यांना सकाळी 9.30 पूर्वी आपल्या कार्यालयात हजर राहण्याचे आदेश दिले होते. तसेच वर्क फ्रॉम होम ही संकल्पनाही बंद करण्यास त्यांनी सांगितले होते. त्यावर आता मंत्र्यांनीही आपल्या कार्यालयात 9 पर्यंत पोहोचण्यासाठी कार्यक्रमांची रूपरेषा बदलण्यास सुरूवात केली आहे. अल्पसंख्यांक मंत्री मुख्तार अब्बास नक्वी यांनीदेखील आपल्या कार्यक्रमांची रूपरेषा बदलण्यास सुरूवात केली आहे. तर केंद्रीय मंत्री रामविलास पासवान यांनीही 9 च्या ठोक्याला आपल्या कार्यालयात पोहोचून सचिवांची बैठक घेतल्याची माहिती समोर आली आहे. दरम्यान, अनेक मंत्र्यांनी वर्क फ्रॉम होम टाळत लवकर ऑफिसला पोहोचण्याला प्राथमिकता दिल्याची माहितीही समोर आली आहे.

दरम्यान, आरोग्य आणि विज्ञान मंत्री डॉ. हर्षवर्धन, तसेच सुचना आणि प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर हे यापूर्वीपासून 9 च्याच ठोक्याला आपल्या कार्यालयात पोहोचत असल्याने त्यांनी यापूर्वीचेच आपले रूटीन सुरू ठेवले आहे. तर अनेक मंत्र्यांनी पंतप्रधानांच्या आदेशाचे पालन करत सकाळी 9 वाजताच आपल्या कार्यालयात पोहोचण्यास सुरूवात केली आहे. रामविलास पासवान यांनी आपल्या कार्यालयात एक डॅशबोर्ड लावण्याच्या सुचना दिल्या असून त्यावर अपडेटेड सुचना देण्यात याव्या असे निर्देश त्यांनी दिले असल्याची माहिती सूत्रांकडून देण्यात आली. टाईम्स ऑफ इंडियाने यासंदर्भातील वृत्त दिले आहे.

तसेच पहिल्यांदाच केंद्रीयमंत्रीपदी विराजमान झालेले अर्जुन मुंडा हेदेखील वेळेवर आपल्या कार्यालयात पोहोचत असल्याची माहिती समोर आली आहे. त्यांनी आपला पदभार स्वीकारल्यापासूनच ते त्यांनी त्वरित कामाला सुरूवात केली आहे. यापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपले उदाहरण देत मंत्र्यांना सकाळी वेळेवर कार्यालयात पोहोचण्याचे आदेश दिले होते. तसेच वर्क फ्रॉम होम ही संकल्पना बंद करण्याचेही निर्देश दिले होते. तसेच त्यानंतर सर्व मंत्री आणि राज्यमंत्र्यांमध्ये कामाचे वाटप करण्यात आले होते.