कर्मचारी निवृत्तिवेतन योजनेअंतर्गत दरमहा एक हजार रुपये निवृत्तिवेतन देण्याची योजना लवकरच राबविण्यात येणार असून देशभरातील सुमारे २८ लाख निवृत्तिवेतनधारकांना या योजनेचा फायदा होणार आहे. मावळत्या यूपीए सरकारने हा निर्णय घेतला होता.
आता निवडणुका संपुष्टात आल्यामुळे कर्मचारी निवृत्तिवेतन-९५ (ईपीएस-९५) या योजनेअंतर्गत किमान निवृत्तिवेतन योजना राबविण्यात येईल, असे संबंधित अधिकाऱ्याने सांगितले. ५ मार्च रोजी निवडणुका जाहीर झाल्यानंतर आचारसंहिता लागू झाल्यामुळे या निर्णयाची अंमलबजावणी करता आली नव्हती. केंद्रीय मंत्रिमंडळाच्या २८ फेब्रुवारी रोजी झालेल्या बैठकीत निर्णय घेण्यात आला होता. देशभरात ४४ लाख निवृत्तिवेतनधारक असून पाच लाख विधवांसह २८ लाख निवृत्तिवेतनधारकांना या निर्णयाचा फायदा होणार आहे.
या योजनेच्या अंमलबजावणीसाठी सरकारला सुमारे १,२१७ कोटी रुपयांची तरतूद करावी लागेल.