हरिद्वार येथील पतंजली आयुर्वेद या कंपनीने तयार केलेल्या कोरोनिल या औषधाला आयुष मंत्रालयाने जागतिक आरोग्य संघटनेच्या प्रमाणन योजनेनुसार प्रमाणपत्र बहाल केले.

करोनावर पुराव्यानिशी सिद्ध झालेले कोरोनिल हे पहिले औषध असल्याचा दावा कंपनीने केला आहे.

कोरोनिलची निर्मिती पतंजली रीसर्च इन्स्टिटय़ूटने केली असून त्यांनी जानेवारी २०२० पासून या औषधावर काम सुरू केले होते.

स्वामी रामदेव यांनी या घडामोडीबाबत सांगितले, की कोरोनिल हे सर्वानाच करोनाविरोधी उपायात प्रभावी असल्याचे दिसून येईल. निसर्गोपचार पद्धतीचा वापर यात केला असून ते सर्वाना परवडणारे औषध आहे. आयुष मंत्रालयाने या औषधाची माहिती सादर केली असून कोरोनिल गोळ्या या कोविड १९ विषाणूला प्रतिबंध करतात.

या वेळी केंद्रीय वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी पतंजलीच्या संशोधनामुळे देशाला नक्कीच फायदा होईल, असे सांगत बाबा रामदेव आणि आचार्य बालकृष्ण यांचे आभार मानले. ते वैज्ञानिक आधाराद्वारे पुन्हा लोकांसमोर आले आहेत, त्यामुळे औषधावरील लोकांचा विश्वास वाढेल, अशी खात्री गडकरी यांनी व्यक्त केली.

केंद्रीय आरोग्य मंत्री हर्ष वर्धन यांनी आयुर्वेदिक उपचार पद्धतींविषयी कौतुक केले. करोना काळात लोकांचा आयुर्वेदावरील विश्वास मोठय़ा प्रमाणात वाढला आहे. करोनाच्या साथीपूर्वी आयुर्वेद संबंधीचा बाजाराची दरवर्षी १५ टक्क्यांनी वाढ होत असे मात्र या काळात ५० ते ९० टक्क्यांनी वाढ झाली, असे सांगत हर्ष वर्धन यांनी भारतातीलच नव्हे तर जगभरातील लोकांचा आयुर्वेदावरील विश्वास वाढत असल्याचे सांगितले.

झाले काय?

केंद्रीय आरोग्य मंत्री हर्ष वर्धन आणि वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्या उपस्थितीत एका कार्यक्रमात कोरोनिल औषध बाजारात आणण्यात आले. कोरोनिलला केंद्रीय

औषध प्रमाणन नियंत्रण संघटनेच्या आयुष शाखेने औषधी उत्पादन म्हणून मान्यता दिली आहे. कोरोनिल हे औषध आता १५८ देशात निर्यात होऊ शकेल.

आधीचा वाद : पतंजली कंपनीने म्हटले आहे, की त्यांनी २३ जूनला कोरोनिल हे औषध जारी केले होते त्या वेळी करोनाची साथ जोरात होती. त्या वेळी आयुष मंत्रालयाने या औषधाला केवळ आजाराची तीव्रता कमी करणारे औषध म्हटले होते. तर आता, आयुष मंत्रालयाने या औषधाचा उल्लेख हा करोनावरील इलाज ऐवजी करोना प्रतिबंधक औषध असा करावा असे सांगितले असल्याचे बाबा रामदेव यांनी सांगितले.

चमत्काराशिवाय नमस्कार मिळत नाही. रामदेवबाबा यांच्या या औषधामुळे देशाला नक्कीच फायदा होईल. सातत्याने संशोधन करणे ही काळाची गरज आहे. – नितीन गडकरी, केंद्रीय वाहतूक मंत्री