केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयाच्या नावामध्ये पुन्हा एकदा बदल करण्यात आला आहे. हे नाव बदलून त्याचे शिक्षण मंत्रालय असे नामकरण करण्यात आले आहे. मात्र, केंद्र सरकारकडून लवकरच याची अधिकृत घोषणा करण्यात येणार आहे. एएनआयने याबाबत ट्विट केले आहे.

केंद्रीय कॅबिनेटची बुधवारी बैठक पार पडली. या बैठकीत मानुष्यबळ विकास मंत्रालयाचे नाव बदलून ते पुन्हा शिक्षण मंत्रालय करण्यात आलं आहे. २९ जुलै रोजी याची अधिकृत घोषणा केली जाणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या या बैठकीत नव्या शिक्षण धोरणालाही मंजूरी देण्यात आली.

मनुष्यबळ विकास मंत्रालयाने (MHRD) मंत्रिमंडळासमोर प्रस्ताव दिला होता की, मंत्रालयाचे सध्याचे नाव बदलून शिक्षण मंत्रालय केले जावे. या प्रस्तावावर मोदी कॅबिनेटने बुधवारी शिक्कामोर्तब केले.

नव्या शिक्षण धोरणाला मंजुरी मिळाल्यानंतर आता संपूर्ण उच्च शिक्षण क्षेत्रासाठी एकच नियामक संस्था असेल. सरकारचं म्हणणं आहे की, यामुळे शिक्षण क्षेत्रातील अस्वस्थता संपवली जाईल. या वर्षी अर्थसंकल्पात (२०२०-२१) अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी नव्या शिक्षण धोरणांची घोषणा केली होती.