विविध प्रकारच्या महागाईचा सामना करणाऱ्या सर्वसामान्य नागरिकांना आता आणखी एका महागाईला समोरे जावे लागणार आहे. रेल्वे मंत्रालयाने प्रवासी भाड्यामध्ये वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. नववर्षांच्या सुरुवातीला म्हणजेच उद्यापासूनच ही भाडेवाढ लागू होणार आहे. लांब पल्ल्याचा प्रवास करणाऱ्यांना अधिक पैसे मोजावे लागणार आहेत. मंगळवारी रेल्वे मंत्रालयाने याची घोषणा केली.

रेल्वे मंत्रालयाने जाहीर केलेल्या या भाडेवाढीनुसार, नॉन एसी सेकंड क्लाससाठी प्रतिकिमी १ पैसा, स्लीपर क्लाससाठी प्रतिकिमी १ पैसा तर फर्स्ट क्लाससाठी प्रतिकिमी १ पैसा अशी भाडे वाढ करण्यात आली आहे.

तर मेल एक्स्प्रेस गाड्यांसाठी सेकंड क्लाससाठी प्रतिकिमी २ पैसे, स्लीपर क्लाससाठी प्रतिकिमी २ पैसे तर फर्स्ट क्लाससाठीच्या भाड्यात प्रतिकिमी २ पैसे अशी वाढ करण्यात आली आहे.

त्याचबरोबर वातानुकुलित श्रेणीसाठी एसी चेअर कारसाठी प्रतिकिमी ४ पैसे, एसी-३ टायरसाठी प्रतिकिमी ४ पैसे, एसी-२ टायरसाठी प्रतिकिमी ४ पैसे आणि एसी फर्स्ट क्लाससाठी प्रतिकिमी ४ पैशांची वाढ करण्यात आली आहे. या सर्व श्रेणीमधील भाडेवाढ १ जानेवारी २०२० पासून लागू होणार आहे.