बलात्काराच्या मन सून्न करणाऱ्या घटना सध्या एकामागोमाग एक समोर येत आहेत. अशात आता पुन्हा एकदा समोर आलेली घटना ही अशीच विषण्ण करणारी आहे. एका १२ वर्षांच्या मुलीवर बलात्कार करण्यात आल्याचा आरोप आहे. ही मुलगी देवीचे जागरण असल्याने एका छोट्या नाटकात दुर्गा देवीची भूमिका साकारत होती. तिच्या सहकलाकाराने तिच्यावर बलात्कार केला असा आरोप आहे. हा कलाकार १६ वर्षांचा मुलगा आहे. या मुलीच्या तक्रारीनंतर या मुलाला अटक करण्यात आली आहे. अलीगढच्या सरसोलमध्ये ही धक्कादायक घटना घडली आहे. या मुलीची वैद्यकीय तपासणी करण्यात आली. त्यानंतर तिच्यावर बलात्कार झाल्याचे तपासणीत स्पष्ट झाले.

देवीचे जागरण असल्याने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. त्यात पीडीत मुलगी आणि तिच्यावर बलात्कार करणाऱ्या तिच्या सहकलाकारानेही भाग घेतला होता. नाटकाचा पहिला अंक संपल्यावर दुर्गा देवीची भूमिका साकारणाऱ्या मुलीला तिच्या सहकलाकाराने शेजारच्या खोलीत नेले आणि तिथे तिच्यावर बलात्कार केला अशी माहिती पोलिसांनी दिली. ‘हिंदुस्थान टाइम्स’ने या संदर्भातले वृत्त दिले आहे. एवढेच नाही तर याबाबत कोणाकडे काही वाच्यता करशील तर याद राख अशी धमकीही त्याने या मुलीला दिली असेही पोलिसांनी म्हटले आहे.

देवीचे जागरण रविवारपर्यंत चालले, तोपर्यंत ही पीडित मुलगी घाबरून गप्प राहिली. मात्र सोमवारी सकाळी तिने आपल्या घरातल्यांना हा सगळा प्रकार सांगितला. त्यानंतर तिच्या आई वडिलांनी तातडीने पोलिसात धाव घेतली. या तक्रारीनंतर आम्ही बलात्कार करणाऱ्या मुलाला पकडण्यासाठी गेलो तेव्हा त्याने पळ काढण्याचा प्रयत्न केला. मात्र आम्ही त्याला पकडले असे पोलिसांनी सांगितले आहे.

पीडित मुलीला जेव्हा आम्ही वैद्यकीय तपासणीसाठी जिल्हा रूग्णालयात घेऊन गेलो तेव्हा तिथे महिला डॉक्टर नव्हती असा आरोप मुलीच्या कुटुंबीयांनी केला. आम्ही याबाबत जाब विचारला असता रूग्णालयाचे वरिष्ठ डॉक्टर तिथे आहे आणि मग आमच्या पीडित मुलीची वैद्यकीय तपासणी करण्यात आली असे या मुलीच्या कुटुंबीयांनी म्हटले आहे.