बंदुकीच्या धाकावर अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याचा चौघांवर आरोप असून, त्यातील एका आरोपीला अटक करण्यात आली आहे. अन्य तिघांचा शोध सुरु आहे. उत्तर प्रदेशातील अमरोहामध्ये ही धक्कादायक घटना घडली आहे. पीडित मुलीची एका आरोपी बरोबर फेसबुकवरुन ओळख झाली होती. त्याला भेटण्यासाठी म्हणून ती गेली होती. त्यावेळी चौघांनी आपल्यावर सामूहिक बलात्कार केला असे पीडित मुलीने तिच्या तक्रारीत म्हटले आहे. टाइम्स ऑफ इंडियाने हे वृत्त दिले आहे.
फेसबुकवरुन मी एका आरोपीच्या संपर्कात होते. त्याने शुक्रवारी मला गजरौला येथे भेटण्यासाठी बोलावले होते. मी पोहोचले, त्यावेळी त्याचे तीन मित्रही तिथे आले. त्यांनी मला जबरदस्तीने जंगलात नेले व तिथे बंदुकीच्या धाकावर माझ्यावर बलात्कार केला असा आरोप पीडित तरुणीने तिच्या तक्रारीत केला आहे.
शनिवारी मुलीने तक्रार नोंदवल्यानंतर आरोपींविरोधात कलम ३७६ ड (सामूहिक बलात्कार), ५०६ आणि पॉस्को कायद्यातंर्गत गुन्हा नोंदवला आहे. “पोलिसांकडे गेले तर, गंभीर परिणाम भोगावे लागतील अशी चौघांनी मला धमकी दिली होती. काही बडया प्रभावशाली लोकांबरोबर ओळख असल्याचा त्यांनी दावा केला होता” असे पीडित तरुणीने सांगितले. वैद्यकीय तपासणीसाठी मुलीला जिल्हा रुग्णालयात पाठवण्यात आले होते.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on January 20, 2020 6:34 pm