ज्या पुरातन मशिदी ऐतिहासिक वास्तू म्हणून घोषित करण्यात आल्या आहेत. त्यामध्ये नमाज पठणास परवानगी द्यावी, अशी शिफारस केंद्रीय अल्पसंख्याक आयोगाने केंद्र सरकारकडे केली आहे. सद्यस्थितीत ऐतिहासिक वास्तू म्हणून घोषित केलेल्या मशिदींमध्ये मुस्लिम धर्मियांना नमाज पठण करू दिले जात नाही.
ऐतिहासिक वास्तूंमध्ये धार्मिक कार्यक्रमांना परवानगी दिल्यास त्यातून वेगवेगळ्या धर्मियांच्या विविध मागण्या पुढे येतील आणि धार्मिक तणाव निर्माण होईल, अशी शक्यता वाटत असल्याने पुरातत्त्व खात्याने आतापर्यंत अशा प्रकारे ऐतिहासिक वास्तूंमध्ये धार्मिक कार्यक्रम घेण्यास विरोध केला होता. मात्र, आता अल्पसंख्याक आयोगानेच ही मागणी केंद्रीय सांस्कृतिक कार्य मंत्रालयापुढे ठेवल्यानंतर पुरातत्त्व खात्याला दिल्लीतील ऐतिहासिक वास्तू गटांत मोडणाऱया ३१ मशिदींचे सर्वेक्षण करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. पुरातत्त्व खात्याने त्यांच्या ताब्यात असलेल्या काही ऐतिहासिक वास्तूंची देखभाल व्यवस्थित न केल्यामुळे त्यांची दुरवस्था झालीये. या स्थितीत जर या वास्तू धार्मिक कार्यक्रमांसाठी खुल्या केल्या, तर स्थानिक नागरिक त्याची चांगली देखभाल करू शकतील, असा अंदाज वर्तविण्यात आला आहे.
केंद्रीय मंत्रिमंडळाच्या सुरक्षाविषयक मंत्रिगटाने या आधी १९९१, १९९२ आणि २००९ मध्ये अशा पद्धतीने ऐतिहासिक वास्तूंमध्ये धार्मिक कार्यक्रम करण्यास परवानगी देणे, सुरक्षेच्या दृष्टीने धोकादायक असल्याचे म्हटले होते. त्यामुळेच ऐतिहासिक वास्तू असलेल्या मशिदींमध्ये नमाज पठण करू देण्यास मंजुरी देण्यात आली नव्हती, अशी माहिती सूत्रांनी दिली.

तुम्हाला काय वाटतं?
ऐतिहासिक वास्तूंमध्ये धार्मिक कार्यक्रमांना परवानगी द्यावी का? तुम्हाला काय वाटतं… तुमचे मत खालील प्रतिक्रियांमध्ये आवर्जून नोंदवा.