भारताची आघाडीची टेनिसपटू सानिया मिर्झा आणि तिचा पती शोएब मलिक यांच्या घरी नव्या पाहुण्याचे आगमन झाले आहे. सानियाने मंगळवारी पहाटे गोंडस मुलाला जन्म दिला आहे. २०१० मध्ये सानिया आणि शोएब विवाहबंधनात अडकले होते. त्यानंतर तब्बल ८ वर्षांनी त्यांच्या घरात नव्या पाहुण्याचे आगमन झाले आहे.

शोएब मलिकने ही आनंदाची बातमी चाहत्यांसोबत शेअर केली आहे. शोएब मलिकने आज सकाळी साडेसात वाजता ट्विटरवर सानिया आई झाल्याची गोड बातमी दिली. “कळवताना अतिशय आनंद होतोय, मुलगा झाला आणि सानियाची प्रकृती उत्तम असून नेहमीप्रमाणे खंबीर आहे, तुमच्या प्रार्थना आणि शुभेच्छांसाठी आभार,” असं शोएबने ट्वीटमध्ये म्हटलं आहे.

काही दिवसांपूर्वी प्रसारमाध्यमांना दिलेल्या मुलाखतीत सानियाने, आपल्या मुलाचं नाव मिर्झा मलिक असं ठेवणार असल्याचं सांगितलं होतं . माझ्या आणि शोएबच्या नावाने माझं मुल भविष्यात ओळखलं जावं अशी माझी इच्छा असल्याचं सानियाने म्हटलं होतं. ३१ वर्षीय सानिया मिर्झाने २०१० साली पाकिस्तानी क्रिकेटपटू शोएब मलिकशी विवाह केला होता. हैदराबादमध्ये पारंपरिक पाकिस्तानी पद्धतीनुसार हा विवाहसोहळा पार पडला होता. २००४ साली सानिया मिर्झाला अर्जुन तर २००६ साली पद्मश्री पुरस्काराने गौरवण्यात आलं.