22 February 2019

News Flash

रुग्णाच्या ‘डिस्चार्ज सर्टिफिकेट’वर डॉक्टरांनी असं काय लिहिलं की वादाला तोंड फुटलं ?

रुग्णाला इस्पितळातून सुट्टी देताना डॉक्टरांनी लिहिलेल्या या शब्दांमुळे आता वादाला तोंड फुटलंय

‘रुग्ण आणि त्याच्या नातेवाईकांना डॉक्टरांवर विश्वास नव्हता. रुग्णाच्या नातेवाईकांनी अरेरावी केली, त्यांचं वागणं असभ्य होतं. अचानक झालेल्या अपघाताच्या परिस्थितीशिवाय आता रुग्णाला तपासलं जाणार नाही.’ असं एका डॉक्टरने आपल्या रुग्णाला इस्पितळातून सुट्टी देताना दिल्या जाणाऱ्या डिस्चार्ज प्रमाणपत्रावर लिहिलं आहे. कोलकात्यामध्ये हा प्रकार समोर आला आहे.

कोलकात्यामध्ये एका रुग्णाला इस्पितळातून सुट्टी देताना डॉक्टरांनी लिहिलेल्या या शब्दांमुळे आता वादाला तोंड फुटलंय. दक्षिण कोलकात्यातील एका रुग्णालयात 24 सप्टेंबर रोजी एका महिला रुग्णाला दाखल करण्यात आलं. नवभारत टाइम्सने दिलेल्या वृत्तानुसार, या महिलेला उच्च रक्तदाब, मधुमेह होता आणि तिला पोटदुखी व विषाणू किंवा सूक्ष्मजंतूंच्या संसर्गामुळे होणारा जठराचा किंवा आतड्याचा त्रास जाणवत होता. या रुग्णाला संबंधित रुग्णालयातून अवघ्या दोन दिवसांमध्ये सुट्टी मिळाली. त्यानंतर डॉक्टरांनी रुग्णाला दिलेल्या डिस्चार्ज प्रमाणपत्रावरुन वादाला सुरुवात झाली. रुग्णाचे नातलग आणि डॉक्टरांनी एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप केले आहेत. रुग्णाकडे डॉक्टर लक्ष देत नव्हते, रुग्णाकडे वारंवर दुर्लक्ष केल्यामुळे रुग्णाच्या नातेवाईकांचा पारा वाढला, असं रुग्णाच्या नातलगांनी म्हटलं आहे. तर रुग्णाच्या नातेवाईकांचं वागणं असभ्य होतं असा आरोप डॉक्टरांकडून केला जात आहे.

या संपूर्ण घटनेबाबत वैद्यकिय क्षेत्राशी संबंधित व्यक्तींनी वेगवेगळी मतं मांडली आहेत. गेल्या काही वर्षांपासून दिवसेंदवस रुग्ण आणि त्यांच्या नातलगांमध्ये वैद्यकिय संस्थांबाबत द्वेष वाढत चाललाय, त्यामुळे डॉक्टर द्विधा मनस्थितीत येतात आणि रुग्णाच्या उपचारावरही परिणाम होतो, असं डॉ. कुणाल सरकार म्हणाले. पश्चिम बंगाल डॉक्टर असोसिएशनचे अध्यक्ष रियाजुल करीम यांनी, हे डिस्चार्ज प्रमाणपत्र म्हणजे डॉक्टरांना कोणत्या परिस्थितीत काम करावं लागतं याचं उदाहरण आहे असं म्हटलं आहे.

First Published on October 12, 2018 4:39 am

Web Title: misbehaving by patient and family writes doctor in discharge letter west bengal