अमेरिकेतील भारतीयांनी येत्या २८ सप्टेंबर रोजी न्यूयॉर्क येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा स्वागत समारंभ आयोजित केला आहे. ‘मिस अमेरिका’ निना दावुलुरी हिचे सूत्रसंचालन या भव्यदिव्य सोहळ्याचे आकर्षण ठरण्याची शक्यता आहे. निना दावुलुरी यंदाच्या मिस अमेरिका पुरस्काराची मानकरी ठरली होती. ‘मिस अमेरिका’ किताब जिंकणारी निना दावुलुरी पहिली इंडो-अमेरिकन महिला आहे. त्यामुळे तिची मोदींच्या स्वागत समारंभाला असणारी उपस्थिती नक्कीच लक्षणीय ठरणार आहे. न्यूयॉर्कमधील प्रतिष्ठित मॅडिसन स्क्वेअर गार्डनमध्ये होणाऱ्या या सोहळ्याला अमेरिकेतील तब्बल २०,००० भारतीय उपस्थित राहणार असल्याचे सांगितले जात आहे. जगातील सर्वात मोठ्या लोकशाही देशातील नागरिक नरेंद्र मोदींचे भाषण ऐकण्यासाठी उत्सुक असल्याचे इंडियन अमेरिकन कम्युनिटी फाऊंडेशनचे (आयएसीएफ) आनंद शहा यांनी सांगितले.