मिस इंडिया कॅस्टेलिनो चौथ्या क्रमांकावर

फ्लोरिडा : मेक्सिकोची अँड्रिया मेझा ही २०२० या वर्षांतील विश्वसुंदरी ठरली असून भारताची मिस इंडिया अ‍ॅडलाइन कॅस्टेलिनो या स्पर्धेत चौथ्या क्रमांकावर आली आहे. ६९ वी विश्वसुंदरी स्पर्धा रविवारी रात्री हॉलिवूडमधील रॉक हॉटेल अँड कॅसिनो येथे घेण्यात आली. साध्या पद्धतीने ही स्पर्धा घेण्यात आली, कारण करोनाची साथ अजून चालू आहे.

गेल्यावर्षी ही स्पर्धा २०२१ पर्यंत लांबणीवर टाकण्यात आली होती.  विश्वसुंदरी स्पर्धेच्या संकेतस्थळावर म्हटले आहे की, मेझा ही २६ वर्षांंची मेक्सिकन तरुणी विश्वसुंदरी ठरली. २०१९ मधील विश्वसुंदरी दक्षिण आफ्रिकेची झोझिबिनी तुंझी हिने  तिच्या डोक्यावर विश्वसुंदरीचा मुकुट चढवला. तू जर तुझ्या देशाची प्रमुख असतीस तर करोनाची साथ कशी हाताळली असतील असा प्रश्न तिला विचारण्यात आला होता. त्यावर तिने असे उत्तर दिले, की ही परिस्थिती हाताळण्यासाठी कुठली आदर्श पद्धत नाही. पण असे असले तरी गोष्टी टोकाला जाण्यापूर्वीच मी टाळेबंदी केली असती. जास्त प्राणहानी यात शक्य असल्याने ती परडवणारी नाही. आपण लोकांची काळजी घेतली पाहिजे. मी देशाची प्रमुख असते तर सुरुवातीपासूनच लोकांची काळजी घेतली असती.

ब्राझीलची ज्युलिया गामा (वय २८) उपविजेती ठरली, तर पेरूची जॅनिक मॅसेटा (वय २७) ही तिसऱ्या क्रमांकावर राहिली.

भारताच्या कॅस्टेलिनो हिने करोनाची दुसरी लाट झेलत असलेल्या भारताबाबत पाठिंब्यासाठी कृतज्ञता व्यक्त केली. लोकांनी मला जे प्रेम व पाठिंबा दिला त्यासाठी आभारी आहे असे तिने म्हटले आहे. मॅरिओ लोपेझ व ऑलिव्हिया कल्पो यांनी तीन तासांच्या या स्पर्धेचे संचालन केले.

मेक्सिकोने विश्वसुंदरीचा बहुमान तिसऱ्यांदा पटकावला आहे. याआधी झिमेना नॅवरेट व लुपिचा जोन्स यांनी २०१० व १९९१ मध्ये हा मान पटकावला होता. व्हूटवर या स्पझ्रेचे थेट प्रक्षेपण करण्यात आले.

सौंदर्य म्हणजे काय?

सौंदर्याचे निकष काय असावेत या विषयावर विचारलेल्या प्रश्नावर अँड्रिया मेझा हिने सांगितले, की आपण आज अधिक प्रगत समाजात राहत आहोत. आजच्या काळात नुसते दिसणे म्हणजे सौंदर्य मानले जात आहे. माझ्यामते सौंदर्य हे आपली जिद्द व आपली मानसिकता प्रतिबिंबित करीत असते. आपल्या वर्तनातून ते दिसत असते.