जपान, दक्षिण कोरिया व अमेरिका यांनी उत्तर कोरियाच्या क्षेपणास्त्र कार्यक्रमाबाबत चिंता व्यक्त केली असतानाच दक्षिण कोरिया आणि उत्तर कोरियाने काही तासांच्या अंतराने क्षेपणास्त्रांची चाचणी केली आहे. त्यामुळे दक्षिण व उत्तर कोरियाची लष्करी क्षमता वाढली असून अमेरिका व मित्र देशांची डोकेदुखी वाढली आहे. उत्तर कोरियावर आता अण्वस्त्र कार्यक्रम सोडण्यासाठी या देशांकडून पुन्हा दबाव वाढवला जाण्याची शक्यता आहे.

दक्षिण कोरियाच्या अध्यक्षीय प्रासादाने म्हटले आहे, की बुधवारी दुपारी पाण्यातून आंतरखंडीय क्षेपणास्त्राची चाचणी करण्यात आली. तीन हजार टनांच्या पाणबुडीवरून हे क्षेपणास्त्र सोडण्यात आले. या क्षेपणास्त्राने ठरवून दिलेले अंतर कापले. निवेदनात म्हटले आहे, की दक्षिण कोरियाने ज्या क्षेपणास्त्राची चाचणी केली त्यामुळे उत्तर कोरियापासून असलेल्या धोक्याचा मुकाबला करणे शक्य होणार आहे. स्वसंरक्षणार्थ या चाचण्या केल्याचे दक्षिण कोरियाचे म्हणणे आहे. त्यानंतर उत्तर कोरियाने दोन कमी पल्ल्याच्या क्षेपणास्त्रांची चाचणी केली आहे. सोमवारी उत्तर कोरियाने क्रूझ क्षेपणास्त्राची चाचणी केली होती. सहा महिन्यांनी सोमवारी प्रथमच उत्तर कोरियाने चाचणी केली. दक्षिण कोरिया सहसा क्षेपणास्त्र चाचण्यांची जाहीर घोषणा करीत नाही पण यावेळी ती करण्यात आली त्यामुळे उत्तर कोरिया अकारण डिवचला गेला आहे. निरीक्षकांच्या मते मून यांचे सरकार उत्तर कोरियाशी समेटाची भूमिका घेत असताना या चाचण्या करण्यात आल्या आहेत.

दक्षिण कोरियाच्या लष्कराने सांगितले, की उत्तर कोरियाची क्षेपणास्त्रे ही मध्य -उत्तर कोरियातून बुधवारी सोडण्यात आली. त्यांनी ८०० कि.मी अंतर ६० कि.मी उंचीवरून कापले. अमेरिकेच्या हिंद प्रशांत कमांडने म्हटले आहे,की उत्तर कोरियाचा क्षेपणास्त्र कार्यक्रम बेकायदेशीर असून त्याचे गंभीर परिणाम होऊ शकतात, त्यामुळे अमेरिकेला धोका निर्माण होऊ शकतो. जपानचे पंतप्रधान योशिहिडे सुगा यांनी सांगितले,की या क्षेपणास्त्र चाचण्यांमुळे शांतता धोक्यात आली आहे. जपान सरकारने टेहळणी वाढवली असून कुठल्याही परिस्थितीला सामोरे जाण्याची तयारी ठेवली आहे.

जपानच्या तटरक्षक दलाने म्हटले आहे, की त्यांच्या कुठल्या जहाज किंवा विमानाचे नुकसान झाले नाही. बुधवारी क्षेपणास्त्र चाचणी करून उत्तर कोरियाने संयुक्त राष्ट्र सुरक्षा मंडळाच्या ठरावाचा भंग केला आहे. असे असले तरी बुधवारी चाचणी करण्यात आलेल्या क्षेपणास्त्रांमुळे नवीन निर्बंध लादले जाण्याची शक्यता कमी आहे. सध्या चीनचे परराष्ट्र मंत्री वँग यी हे वाटाघाटीसाठी दक्षिण कोरियात आले असताना उत्तर कोरियाने चाचण्या केल्या आहेत. दरम्यान आंतररराष्ट्रीय राजनैतिक क्षेत्रात चीनच्या भूमिकेचे उत्तर कोरियाबाबतच्या पेचासंदर्भात दक्षिण कोरियाचे अध्यक्ष मून यांनी स्वागत केले आहे.