उत्तर कोरियाने पूर्व किनाऱ्यावर तीन आंतरखंडीय क्षेपणास्त्रांचे प्रक्षेपण केले, हा शक्तिप्रदर्शनाचा प्रकार असून चीनमध्ये जी २० देशांची बैठक सुरू असतानाच उत्तर कोरियाने हे कृत्य केले आहे. जपानच्या सागरात म्हणजे पूर्व सागरात वांगजू परगण्यातून क्षेपणास्त्रे सोडण्यात आली, असे संरक्षण मंत्रालयाच्या प्रवक्त्याने म्हटले आहे. दोनच आठवडय़ांपूर्वी उत्तर कोरियाने पाणबुडीवरून क्षेपणास्त्रे सोडली होती. सोमवारी त्या देशाने नेमकी कुठल्या प्रकारची क्षेपणास्त्रे सोडली हे समजलेले नाही पण दक्षिण कोरिया त्याचे विश्लेषण करीत आहे. उत्तर कोरियाने या वर्षांत अनेक क्षेपणास्त्र चाचण्या केल्या असून २४ ऑगस्टला पाणबुडीवरून क्षेपणास्त्रे डागली होती. त्यांचा पल्ला ५०० किलोमीटर म्हणजे ३०० मैलांचा होता. त्यावेळच्या कृत्याचाही जगात निषेध झाला होता. उत्तर कोरिया अणुहल्ल्यांची क्षमता प्राप्त करीत आहे अशी भीती व्यक्त करण्यात येत आहे.

दक्षिण कोरियाच्या अध्यक्षा पार्क गेन हाय व चीनचे अध्यक्ष क्षी जिनपिंग यांची जी २० शिखर बैठकीच्या निमित्ताने चीनमधील हांगझाऊ येथे भेट होत असताना उत्तर कोरियाने हे शक्तिप्रदर्शन केले आहे. उत्तर कोरियाचा चीन हा मित्र देश असून अणुचाचण्या व क्षेपणास्त्र चाचण्यांमुळे चीन व उत्तर कोरिया यांच्यातील संबंधही अलीकडे ताणले गेले आहेत.