अल्जिरियाच्या बेपत्ता झालेल्या विमानाचा सांगाडा बुर्किनो फोसो सीमेजवळ माली येथे सापडला आहे, असे लष्कराच्या समन्वयकाने सांगितले.
बुर्किना फासोच्या लष्कराचे जनरल गिलबर्ट डिएनडिएर यांनी सांगितले, की अल्जिरियन विमानाचा सांगाडा बुर्किना फोसोच्या सीमेजवळून ५० कि.मी. अंतरावार मालीच्या गोसी भागात सापडला आहे. एका व्यक्तीने हे विमान पडताना पाहिले असल्याचे सांगून ते म्हणाले, की उड्डाणमार्गाच्या रडार प्रतिमा जुळवून ते विमान अल्जिरियाचेच असल्याची खातरजमा करण्यात येईल. फ्लाइट एएच ५०१७ हे विमान क्वांगाडोगाऊ येथून अल्जिरियाकडे निघाले असताना कोसळले होते व त्यात ५१ फ्रेंच नागरिक होते.जोरदार वादळामुळे हे विमान पडले असावे असे विमान कंपनीच्या सूत्रांनी सांगितल्याचे परराष्ट्रमंत्री लॉरेंट फॅबियस यांनी स्पष्ट केले.
या विमानाचे कर्मचारी स्पॅनिश होते व त्यांनी विमानाचा मार्ग खराब हवामानामुळे बदलत असल्याचे सांगितले होते. अल्जिरियाचे पंतप्रधान अब्देलमालेक सेल्लाल यांनी ते विमान अल्जिरियम सीमेपासून ५०० कि.मी. अंतरावर असताना रडारवरून नाहीसे झाल्याचे अल्जिरियन रेडिओला सांगितले होते.
२४ बुर्किनाबे, आठ लेबनित्झ, सहा अल्जिरियन, सहा स्पॅनिश, पाच कॅनेडियन, चार जर्मन, चार लक्झेमबर्गचे नागरिक होते. स्पेनच्या स्विफ्टएअर कंपनीचे हे विमान अल्जिरियाने भाडय़ाने घेतले होते. बुर्किना फासोच्या अधिकाऱ्यांनी सांगितले, की मृतदेह जळालेल्या अवस्थेत आहेत.
घातपात नाही, वादळाने घात केला!
एअर अल्जिरियाचे हे विमान माली येथे कोसळले. ते पाडण्यात आलेले नाही असे फ्रान्सचे वाहतूकमंत्री फ्रेडरिक कव्हिलियर यांनी सांगितले. मालीच्या उत्तरेला असलेल्या बंडखोरांनी विमान पाडल्याची चर्चा होती, पण हे विमान पावसाळी वादळामुळे पडले आहे असे सांगण्यात आले.   या विमानाच्या सांगाडय़ाचे रक्षण करण्याकरता फ्रान्सने एक युनिट सैन्य माली येथे पाठवले आहे. ११६ प्रवासी असलेले हे विमान काल कोसळले होते. विमानाचे तुकडे झाले असले तरी ते स्पष्टपणे ओळखण्यात आले आहे, असे फ्रान्सचे अध्यक्ष फ्रँ कॉइस ऑलाँद यांनी म्हटले आहे.