जुलैपासून बेपत्ता असलेल्या एएन ३२ या विमानातील सर्व प्रवासी मृत्यूमुखी पडल्याची शक्यता हवाई दलाने वर्तवली आहे. हवाई दलाने विमानातील प्रवाशांच्या नातेवाईकांना ही माहिती दिली असून आता या विमानासाठीची शोधमोहीमही थांबवण्यात येणार आहेत.
हवाई दलाचे एएन ३२ हे विमान २२ जुलैरोजी चेन्नईहून पोर्टब्लेअरच्या दिशेने निघाले होते. मात्र बंगालच्या उपसागरात हे विमान बेपत्ता झाले. हवाई दल आणि नौदलाच्या जहाजांनीही या विमानाचा कसून शोध घेतला. या विमानात कर्मचा-यांसह २९ प्रवासी होते. विमानातील इमर्जन्सी लोकेटर ट्रान्समीटर काम करत नसल्याने शोधमोहीमेत आणखी अडथळे येत होते. शोधपथकांनी विमानाचे चेन्नईपासून १५० नोटिकल मैल परिसर पिंजून काढला. पण विमानाविषयी कोणतीही माहिती मिळत नव्हती. संरक्षण मंत्री मनोहर पर्रिकर यांनीदेखील या शोधमोहीमेत लक्ष घातले होते. या विमानात २९ प्रवाशांमध्ये हवाई दलाचे ४ अधिकारीही होते. २२ जुलैला उड्डाणानंतर सकाळी साडे नऊपर्यंत विमान संपर्कात होते. पण त्यानंतर विमानाचा संपर्क तुटला. साडे अकराच्या सुमारास विमान पोर्टब्लेअरमध्ये दाखल होणे अपेक्षित होते. मात्र विमान पोर्टब्लेअरलाही दाखल झाले नाही. शेवटी विमान बेपत्ता झाल्याचे स्पष्ट झाले आणि शोधमोहीमेला सुरुवात झाली.
गेल्या दोन महिन्यापासून विमानातील प्रवाशांचे नातेवाईक हवाईदलाकडे शोधमोहीमेविषयी माहिती घेत होते. शेवटी गुरुवारी हवाई दलाने विमानातील सर्व प्रवासी मृत झाले असावेत अशी माहिती प्रवाशांच्या कुटुंबीयांना दिली आहे. याच विमानातून प्रवास करीत असलेले पिंपरीचे फ्लाइट लेफ्टनंट कुणाल बारपट्टे यांच्या कुटुंबीयांनी या दुर्घटनेनंतर संरक्षणमंत्री मनोहर पर्रिकर यांचीही भेट घेतली होती.