जम्मू-काश्मीरच्या रामगढ सेक्टरमध्ये मंगळवारी पाकिस्तानकडून झालेल्या गोळीबारानंतर बेपत्ता झालेल्या बीएसएफच्या जवानाचा मृतदेह सापडला आहे. पाकिस्तानकडून मंगळारी सकाळी जवळपास पावणे अकराच्या सुमारास गोळाबार झाला, त्यानंतर एक जवान बेपत्ता झाल्याचं समोर आलं होतं. त्यानंतर शोधमोहिम राबवण्यात आली आणि संध्याकाळी उशीरा त्यांचा मृतदेह सापडला. मृत जवानाचा गळा चिरण्यात आला आहे. छिन्न-विछिन्न अवस्थेत या जवानाचा मृतदेह मिळाला असून धडापासून शीर वेगळा करण्याचा प्रयत्न झाल्याची शक्यता काही माध्यमांनी वर्तवली आहे.


मिळालेल्या माहितीनुसार, विध्वंसक कारवायांसाठी कुख्यात असलेल्या पाकिस्तानच्या बॉर्डर अॅक्शन टीम (बॅट)नं हा भ्याड हल्ला केल्याचे बोललं जात आहे. सीमा सुरक्षा दलाचे काही जवान मंगळवारी नियंत्रण रेषेजवळ स्वच्छता करत होते. ते गवत काढण्यासाठी एलओसी जवळ गेले होते. यावेळी पाकिस्तानी सैन्याने अंदाधुंद गोळीबार सुरू केला. त्याला भारतीय जवानांकडून प्रत्युत्तर देण्यात आलं, पण याच दरम्यान एक जवान बेपत्ता झाला होता. जवानाच्या मृतदेहावर अनेक ठिकाणी जखमा आढळून आल्या आहेत. पाकिस्तानच्या बॅट टीमने हा हल्ला केल्याची शक्यता वर्तवली जात आहे. मात्र, बीएसएफकडून अद्याप यावर प्रतिक्रिया दिलेली नाही. दरम्यान, जवानाचा मृतदेह सापडल्यापासून एलओसीवर तणावपूर्ण वातावरण आहे.