तटरक्षक दलाच्या ‘डॉर्नियर’ विमानाचे अवशेष  तामिळनाडूच्या समुद्रात ९५० मीटर खोल पाण्यात शुक्रवारी सापडले. या अवशेषांमध्ये ‘फ्लाइट डेटा रेकॉर्डर’चाही समावेश आहे. ३३ दिवसांपूर्वी बेपत्ता झालेल्या या विमानाचा शोध घेण्यासाठी अनेक सरकारी यंत्रणा गुंतल्या होत्या.
सर्व स्तरांवर प्रथमच पार पडलेली ही आगळीवेगळी कामगिरी आहे, असे संरक्षण मंत्रालयाने म्हटले आहे. तीन कर्मचाऱ्यांसह या विमानाने चेन्नईहून ८ जून रोजी नित्याच्या सरावासाठी उड्डाण केले. त्यानंतर तिरुचिरापल्लीतील चिदंबरम् जिल्ह्य़ाच्या किनाऱ्यापासून १६ किलोमीटर अंतरावर रात्री नऊ वाजून २३ मिनिटांनी रडारवर या विमानाचा शेवटचा ठावठिकाणा लागला. ‘फ्लाइट डेटा रेकॉर्डर’ सापडल्यामुळे या घटनेचा महत्त्वपूर्ण तपशील मिळण्यास मदत होईल, असे सांगण्यात आले.
साधारण महिनाभरापूर्वी या विमानाचा शोध सुरू झाला होता. कुडलोरच्या ईशान्येकडील समुद्रात विमानाचे अवशेष सापडले. भारतीय तटरक्षक दलाच्या ‘सिंधुवाहिनी’ या पाणबुडीच्या सहाय्याने या विमानाचा शोध जारी होता. या पाणबुडीने ६ जुलै रोजी ९९६ मीटर खोल पाण्यात काही भाग मिळविला होता.