चेन्नई नाम्मालवरपेठ येथे राहणारी १९ वर्षाची तरुणी नीट परिक्षेचा निकाल जाहीर झाल्यानंतर बेपत्ता झाली होती. ही तरुणी गुरुवारी सकाळी बिहारमधल्या हॉटेलमध्ये सापडली. कोट्टीश्वरी असे या तरुणीचे नाव असून नीट परिक्षेत कमी गुण मिळाल्यामुळे ती निराश झाली होती. कोट्टीश्वरीला डॉक्टर बनायची इच्छा होती. त्यासाठी तिला एमबीबीएसला प्रवेश करायचा होता. पण नीट परिक्षेत अपेक्षित गुण न मिळाल्याने ती निराश झाली होती.

चार जूनला या मुलीने तिच्या आईला मोबाईलवर मेसेज पाठवला. नीट परिक्षेत कमी गुण मिळाल्यामुळे मी निराश झाले आहे. मला शोधण्याचा प्रयत्न करु नका असे त्या संदेशात म्हटले होते. कोट्टीश्वरीच्या आई-वडिलांनी तक्रार दाखल केल्यानंतर सेक्रीटरीयंट कॉलनी पोलिसांनी तिचा मोबाइल नंबर ट्रॅक करण्याचा प्रयत्न केला.

या मुलीच्या मोबाईलचे शेवटचे लोकेशन चेन्नई रेल्वे स्टेशन दिसत होते. कारण तिथेच तिने मोबाइल स्विच ऑफ केला होता. तिने पुन्हा मोबाईल स्विच ऑन केल्यानंतर बिहारचे लोकेशन येत होते. बिहारच्या एका हॉटेलमध्ये ती तरुणी थांबली होती. चेन्नई पोलिसांनी बिहार पोलिसांशी संपर्क साधला व त्या मुलीपर्यंत पोहोचले. त्यानंतर चेन्नई पोलिसांनी त्या मुलीला आई-वडिलांकडे सोपवले.