आरक्षणाच्या मागणीसाठी गुजरातमध्ये पटेल समाजाचे नेतृत्त्व करणारा हार्दिक पटेल मंगळवारी ‘गायब’ झाल्यानंतर बुधवारी सुरेंद्रनगर जिल्ह्यातील ध्रंगधरा गावाजवळ तो पुन्हा मिळाला. काही लोकांनी शस्त्रांच्या साह्याने आपले अपहरण केले होते, असा दावा हार्दिकने केला आहे. बेपत्ता होणे आणि त्यानंतर एका दिवसात पुन्हा मिळणे, यामुळे बेपत्ता प्रकरणातील गूढ वाढले आहे.
हार्दिक पटेल म्हणाला, बयादजवळ काही लोक माझ्या गाडीचा पाठलाग करीत होते. त्या पैकी काहींनी माझी गाडी अडविली आणि मला दमदाटी केली. मला रात्रभर गाडीमध्येच ठेवण्यात आले होते. आंदोलन थांबव, नाहीतर तुझा जीव घेऊ, अशी धमकीही मला त्यांच्याकडून देण्यात आली. यापुढे कोणत्याही सभेमध्ये भाषण केल्यास आपल्याला मारून टाकण्यात येईल, अशी धमकी अपहरणकर्त्यांपैकी एकाने दिली, असे त्याने सांगितले. त्यानंतर बुधवारी सकाळी त्यांनी मला ध्रुंगधरा गावाजवळ सोडून दिल्याचे त्याने सांगितले.
बुधवारी हार्दिकने आंदोलनकर्त्यांपैकी काहींना फोन करून आपण कुठे आहोत, याची माहिती दिली. त्यानंतर त्याच्या सहकाऱ्यांनी तिथे पोहोचून त्याला सोबत घेतले. दरम्यान, हार्दिक कुठे आहे, याचा शोध घ्यावा असे तोंडी आदेश गुजरात उच्च न्यायालयाने मंगळवारी रात्री गुजरात पोलीसांना दिले. त्याचबरोबर या विषयावरून राज्य सरकारला नोटीस बजावण्यात आली होती. या प्रकरणी दाखल झालेल्या याचिकेवरील सुनावणीसाठी मंगळवारी रात्री न्यायालयाचे दरवाजे उघडण्यात आले आणि सुनावणी करण्यात आली होती.