09 March 2021

News Flash

इंटरपोलच्या ‘बेपत्ता’ प्रमुखांचा राजीनामा, चौकशीसाठी ताब्यात घेतल्याचं चीनने केलं मान्य

गेल्या अनेक दिवसांपासून बेपत्ता असलेले आंतरराष्ट्रीय पोलीस संघटनेचे (इंटरपोल) प्रमुख मेंग हाँगवेई यांचा राजीनामा

मेंग हाँगवेई

गेल्या अनेक दिवसांपासून बेपत्ता असलेले आंतरराष्ट्रीय पोलीस संघटनेचे (इंटरपोल) प्रमुख मेंग हाँगवेई यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. ‘मेंग हाँगवेई यांचा राजीनामा आम्हाला प्राप्त झाला आहे’, अशी माहिती आंतरराष्ट्रीय पोलीस संघटनेकडून रात्री उशीरा देण्यात आली. यासोबतच मेंग होंगवेई यांना चीनने ताब्यात घेतल्याचंही स्पष्ट झालं आहे. मेंग हाँगवेई बेपत्ता झाल्याचं समोर आल्याच्या अनेक दिवसांनंतर अखेर चीनने हाँगवेई यांना ताब्यात घेतल्याचं मान्य केलं आहे. देशातील काही कायद्यांचं उल्लंघन केल्याप्रकरणी मेंग होंगवेई यांची चौकशी सुरू असल्याचं चीनकडून सांगण्यात आलं आहे. मेंग हाँगवेई यांच्या राजीनाम्यानंतर दक्षिण कोरियाच्या किम जोंग यांग यांना हंगामी अध्यक्षपद देण्यात आलं आहे. 18 ते 21 नोव्हेंबर दरम्यान दुबईत संघटनेची बैठक होईल, त्यामध्ये नवा प्रमुख निवडला जाईल अशी माहिती आंतरराष्ट्रीय पोलीस संघटनेने दिली.

हाँगवेई हे सप्टेंबरच्या अखेरीस दक्षिण-पूर्व फ्रान्समधील लिऑन येथील इंटरपोलच्या मुख्यालयातून बाहेर पडताना अखेरचे दिसले होते. त्यावेळी ते चीनला रवाना होणार होते. नोव्हेंबर 2016 मध्ये इंटरपोलच्या चीनमधील प्रमुखपदी निवड होण्यापूर्वी मेंग हे चीन सरकारमधील सार्वजनिक सुरक्षा विभागाचे उपमंत्री होते. या काळात त्यांनी गुप्तहेरांवर मोठा अंकुश राखला होता. मेंग हे चीनचे पहिले इंटरपोल अधिकारी राहिले आहेत. त्यामुळे इंटरपोलच्या 192 देशांतील कायदा अंमलबजावणी संस्थांशी ते जोडले गेले होते. २०२० पर्यंत ते इंटरपोलच्या प्रमुख पदी राहणार होते. हाँगवेई बेपत्ता झाल्याचं समोर आल्यापासून त्यांना चीननेच ताब्यात घेतलं असावं अशी दाट शक्यता वर्तवली जात होती.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 8, 2018 4:43 am

Web Title: missing interpol president meng hongwei resigns
Next Stories
1 गुजरातमध्ये यूपी-बिहारींविरोधात हिंसक आंदोलन, आतापर्यंत 342 जणांना अटक
2 ‘इंडिगो’विरोधात बोंबाबोंब, प्रवाशांची तारांबळ
3 महंत परमहंस दास पोलिसांच्या ताब्यात, राम मंदिरासाठी सात दिवसांपासून सुरू होतं उपोषण
Just Now!
X