सोमवारी अमेठीमध्ये पोस्टर वॉर पाहायला मिळालं. केंद्रीय मंत्री आणि खासदार स्मृती इराणी यांच्याविरोधात अमेठीतील अनेक ठिकाणी पोस्टर लावल्याचं दिसून आलं. यामध्ये त्यांचा ‘हरवलेल्या खासदार’ असा उल्लेख करण्यात आला आहे. तसंच या लावण्यात आलेल्या पोस्टर्समधून त्यांना काही सवालही करण्यात आले आहेत. हे पोस्टर कोणी लावले याबाबत मात्र माहिती समोर आली नाही. ‘तुम्ही अमेठीत केवळ खांदा देण्यासाठीच येणार का?’ असा सवालही पोस्टरद्वारे करण्यात आला आहे.

सोमवारी दुपारी जिल्ह्यातील अतरौली, शाहगढ ब्लॉकच्या बहोरखा प्राथमिक शाळेजवळ आणि आसपासच्या ठिकाणी असलेल्या भितींवर आणि खांबांवर केद्रीय मंत्री आणि अमेठीतून निवडून आलेल्या खासदार स्मृती इराणी यांच्याविरोधातील पोस्टर चिकटवल्याचं दिसून आलं. हरवलेल्या खासदारांना काही सवाल, असं त्या पोस्टरमध्ये लिहिण्यात आलं होतं. ‘अमेठीतून खासदार म्हणून निवडून आल्यानंतर (वर्षभरातून केवळ दोन दिवस) काही तासांसाठीच आलेल्या खासदार स्मृती इराणी आज करोनाच्या संकटामुळे अमेठीची जनता त्रस्त आणि भयभीत झाली आहे. आम्ही नाही म्हणत की तुम्ही गायब आहात…,’ असं त्या पोस्टरमध्ये नमूद करण्यात आलं आहे.

‘आम्ही तुम्हाला ट्विटरवर अंताक्षरी खेळताना पाहिलं. आम्ही तुमच्या माध्यमातून एकाद व्यक्तीला जेवणही पुरवताना पाहिलं आहे. आज या संकटकाळात अमेठीची जनता तुम्हाला शोधत आहे. संकट काळात अमेठीच्या लोकांना असं सोडणं हे दाखवतं की अमेठी तुमच्यासाठी केवळ टूर हब आहे. आता तुम्ही केवळ अमेठीमध्ये खांदा देण्यासाठी येणार का?,’ असा सवालही पोस्टरमधून करण्यात आला आहे.

स्मृती इराणींचा काँग्रेसवर निशाणा

या पोस्टर वॉरवरून स्मृती इराणी यांनी काँग्रेसवर निशाणा साधला आहे. “तुम्हाला माझ्यावर एवढं प्रेम आहे हे माहित नव्हतं. तुम्हालाही काही हिशोब दिला जावा. ८ महिने १० दिवस आणि १४ दिवसांचा हिशोब माझ्याकडे आहे. परंतु सोनिया गांधी यादरम्यान आपल्या मतदार संघात कधी गेल्या?,” असा सवाल त्यांनी केला आहे.