एमएच ३७० या बेपत्ता मलेशियन विमानातील प्रवाशांच्या कुटुंबीयांनी विमानाचा शोध सुरू ठेवण्यात यावा, असे भावनिक निवेदन संबंधित अधिकाऱ्यांकडे केली आहे.

ऑस्ट्रेलियाच्या नेतृत्वाखालील आघाडी या बेपत्ता विमानाचा हिंदी महासागरात शोध घेत आहे. जुलैपर्यंत ही शोधमोहीम राबवून ती थांबविण्यात येणार आहे. त्यामुळे ही शोधमोहीम सुरू ठेवावी यासाठी प्रवाशांच्या कुटुंबीयांनी निवेदन केले आहे. विमानासंबंधी आणखी काही पुरावे मिळेरयत ही मोहीम सुरूच ठेवावी, असेही त्यांनी म्हटले आहे.

सध्या सुरू असलेल्या ठिकाणीच ही मोहीम सुरू ठेवावी. या बेपत्ता विमानाचा काही भाग नक्कीच सापडेल आणि या प्रकरणाचे रहस्य समजेल असा विश्वास कुटुंबीयांनी व्यक्त केला आहे. या विमान दुर्घटनेला ८ मार्च रोजी दोन वर्षे पूर्ण होत असतानाच हे निवेदन देण्यात आले. ८ मार्च २०१४ रोजी क्वालालंपूरवरून बीजिंगला २३९ प्रवाशांना घेऊन जाणारे हे विमान बेपत्ता झाले होते.

विमानात प्रवास करणाऱ्या कुटुंबीयांचे काय झाले याची काहीच माहिती नसून ही घटना मोठा आघात करणारी असल्याचे निवेदनात म्हटले आहे. हे विमान हिंदी महासागरातच कोसळले असून खोल समुद्रात विमानाचे अवशेष मिळू शकतील, असा तज्ज्ञांचा विश्वास आहे. मात्र, आतापर्यंत या शोधमोहिमेवर मलेशिया आणि चीनकडून मोठय़ा प्रमाणात खर्च करण्यात आला असला तरी विमान शोधण्यात अपयश आले आहे. गेले काही महिन्यांत जोरदार मोहिम सुरू आहे.